Kolhapur News : 'पूर्वीच्या पराभवाची जखम अजून विसरलो नाही','लोकसभा लढवायची आहे; पण स्वतःच्या स्वराज्य पक्षाकडूनच', 'महाविकास आघाडीचा पाठिंबा हवा; पण कुठल्याही पक्षात जाणार नाही, या भूमिकांमुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नेमके चाललेय तरी काय?' असा प्रश्न जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राला पडला आहे. अशा धरसोड भूमिकांमुळे त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. (Sambhajiraje Chhatrapati)
लोकसभेच्या 2009 ला संभाजीराजेच्या निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर माजी खासदार संभाजीराजे हे राजकीय विजनवासात गेल्यासारखी स्थिती होती; पण 2016 मध्ये राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. सहा वर्षाच्या काळात त्यांनी गड -किल्ल्यांचे संवर्धन केले. त्यांच्या प्रयत्नातूनच रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली. त्यासाठी कोट्यवर्धींचा निधी मिळाला. अशी काही उल्लेखनीय कामे सोडली, तर त्यांच्याकडून फारसे काही झाले नाही. (Political news )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यसभेची मुदत संपत असतानाच आमदारांतून होणारी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली. त्यावेळीही त्यांना शिवसेनेकडून उमेदवारीची 'ऑफर होती; पण भाजपच्या कोट्यातून पूर्वी खासदार झाल्यानंतर शिवसेनेची उमेदवारी घ्यायची कशी? यामुळे तिथेही त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला. परिणामी अनुमोदक, सूचकही या निवडणुकीत मिळणे त्यांना मुश्किल झाले. संभाजीराजे या निवडणुकीत उमेदवार असते, तर कदाचित ही निवडणुक बिनविरोधही झाली असती. आता लोकसभेच्या उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच त्यांच्याकडून पुन्हा धरसोड भूमिकेचे समर्थन होताना दिसत आहे. सद्यस्थितीत 'महाविकास आघाडीमधील काँग्रेस वगळता शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ताकदीचा उमेदवार नाही.
काँग्रेसची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील बाजू भक्कम असली तरी बाजीराव खाडे वगळता दुसरे नाव येत नाही. राष्ट्रवादीतून व्हि. बी. पाटील, तर जागा कोणालाही मिळाली तरी उमेदवार मीच अशी आशा ठेवून गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके प्रचाराला लागलेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांनीच उमेदवारी घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण संभाजीराजे यांच्याकडून मात्र त्यासाठी प्रतिसाद दिसत नाही. 'महाविकास आघाडीचा पाठिंबा हवा; पण स्वराज्य मधूनच लढणार यावर ते ठाम आहेत; पण राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची चालून आलेली
उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेचाच त्यांना उमेदवारी देण्यास विरोध असल्याचे समजते. त्यातही ते स्वतः कोल्हापुरमधून लढणार की नाशिक किंवा अन्य मतदारसंघातून याविषयी स्पष्टता नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विदर्भ, मराठवाडा भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग असूही शकेल. कोल्हापूरचे राजकारणच वेगळे आहे. या जिल्ह्यात कोणाला निवडून देण्यापेक्षा पाडायचे कोणाला यावरच मतदान होते. त्याचा अनुभव त्यांनीही घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नेमके चाललंय काय? असा प्रश्न राजकीय क्षेत्राला पडल्यावाचून राहत नाही.
Edited By : Rashmi Mane
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.