Sangli Congress Vs Shivsena : काँग्रेसच्या ‘मटण-भाकरी’ने खवळली शिवसेना, घात केल्याचा आरोप

Sangli Loksabha Election News : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही, मात्र या आपत्तीत काँग्रेस अधिक मजबुतीने एकजुट झालेली दिसली. लोकसभा निवडणुकीत हे वारे वाहताना दिसले.
Sangli Congress Vs Shivsena
Sangli Congress Vs ShivsenaSarkarnama

Sangli News : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत सांगलीची लढत सर्वात चुरशीची ठरली. या ठिकाणी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस पक्षांतच वादाची ठिणगी पडली. उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत थेट ठाकरेंच्याच उमेदवाराविरोधात दंड थोपटलं आणि माघार न घेता नव्या चिन्हासह लढलेही.त्यामुळे साहजिकच ठाकरे गट आणखी चवताळला. हा वाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. आता काँग्रेसच्या 'मेजवानी'वरुन ठाकरे गट काँग्रेसवर पुन्हा एकदा तुटुन पडला आहे.

नेता निवडणुकीला उभा राहतो, कार्यकर्ता राबतो... त्या कार्यकर्त्याचा सन्मान करणं हे नेत्यांचं आद्य कर्तव्य... असं सांगत काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी श्रमपरिहाराचा घाट घातला. कार्यकर्त्यांना मटण-भाकरी खाऊ घातली. एक का दोन... पाच-सहा हजार कार्यकर्ते तृत्प झाले, त्यांनी समाधानाची ढेकर दिली. पण या जेवणावळीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मात्र पित्त खवळले आहे.

Sangli Congress Vs Shivsena
Satara Palika News : सातारा पालिकेत पेटला ढाबळीचा वाद; उदयनराजेंचा गट आक्रमक

कारण, हा श्रमपरिहार कुणाचा, कुणासाठी? त्याला अपक्ष, बंडखोर विशाल पाटलांची हजेरी कशासाठी? सगळ्यांनी मिळून शिवसेनेचा घात केला आणि आता श्रमपरिहार कसला करताय, हे तर शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळणे झाले, असा हल्लाबोल जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना केला आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील (Vishal Patil) यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी केली. ‘लिफाफा’ चिन्ह घेऊन ते लढले. त्यांना काँग्रेसने जोरदार ताकद दिली. अनेक नेते, कार्यकर्ते उघडपणे तर काहीजण छुप्या पद्धतीने विशाल यांच्या प्रचारात उतरले. त्यापैकीच एक होते शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील. या पाटलांनी विशाल पाटलांसाठी अंडरग्राऊंड यंत्रणा राबवली, असा आरोप शिवसेना करते आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागातील बूथ यंत्रणेचे संपूर्ण नियोजन पृथ्वीराज पाटील यांच्या टीमने केले. त्यांची विधानसभा निवडणुकीसाठीची सगळी टीम मैदानात छुप्या पद्धतीने काम करत होती.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पृथ्वीराज काही सभांमध्ये महाविकास आघाडीसोबत दिसले, मात्र व्यासपीठावरून उतरताच विशाल यांच्या प्रचारात सक्रिय झाले, त्यांचा मुलगा वीरेंद्र तर मुठी आवळून भाषण करत होता, अशी टीका करत विभुते यांनी पृथ्वीराज पाटील यांचीदेखील काँग्रेसने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. त्याला कारण ठरले ते श्रमपरिहार जेवण आणि त्याला आमदार विश्‍वजीत कदम (Vishwajit Kadam), विशाल पाटील यांची हजेरी. ती शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही, मात्र या आपत्तीत काँग्रेस अधिक मजबुतीने एकजुट झालेली दिसली. लोकसभा निवडणुकीत हे वारे वाहताना दिसले. आता हेच वारे विधानसभेला कायम रहावे, असा प्रयत्न इच्छुकांनी सुरु केला आहे. सन 2019 ला सांगली विधानसभा मतदारसंघातून अवघ्या साडेसहा हजार मतांनी पराभूत झालेल्या पृथ्वीराज पाटील यांनी अचूक टायमिंग साधत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ‘डिनर पार्टी’ आयोजित केली होती.

Sangli Congress Vs Shivsena
Arvind Kejriwal News : दिल्लीनंतर भाजपची 'या' राज्यांकडे वक्रदृष्टी; केजरीवालांचा मोठा आरोप

ही काँग्रेस कार्यकर्त्यांची पार्टी होती तर मग त्यात विशाल यांचे काय काम, असा सवाल शिवसेना करते आहे. किमान निकालाची, 4 जूनची तरी वाट पहायची होती, त्याआधीच हा खेळ करून शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्याचा त्यांचा आरोप आहे.

दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज पाटील यांना मात्र विधानसभेला चार महिने बाकी असतानाच शड्डू ठोकून सांगलीतून प्रचाराची सलामी दिली आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांसह विरोधकांनाही हा इशारा लक्षात आल्याचे चित्र दिसत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sangli Congress Vs Shivsena
Nagar Urban Bank Fraud : 'त्या' भाजप नेत्यांवर कारवाईची धमक फडणवीस दाखवणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com