सांगली : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांना अपेक्षित यश मिळाले नाही. याच निकालातून निर्माण झालेल्या राजकीय समीकरणांची धास्ती घेत भाजपने सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधची भूमिका घेतली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरुवातीला निवडणुकीची तयारी आणि सर्व जागांवर लढण्याची भाषा झाली असतानाच दुष्काळाचे कारण पुढे करून जागावाटपाचा समझोता झाला, अशी या निवडणुकीची चर्चा रंगली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. इच्छुकांची मोठी संख्या, उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच आणि काही अर्जांबाबत न्यायालयापर्यंत गेलेला वाद यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरेल, असे चित्र होते. मात्र, अखेर सर्वपक्षीय नेत्यांच्या चर्चेतून २१ पैकी १५ जागांवर बिनविरोधचा मार्ग निघाला; उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक कायम राहिली.
याच परिस्थितीवर सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी 'सांगली.कॉम' या सदरामध्ये याबद्दलची रोखठोख भूमिका मांडली आहे.
अहो विपरीत घडले, दुष्काळाची ढाल पुढे करत निवडणूक करायला गेले बिनविरोध...पण, संपन्न भागाचे नेते झाले बिनविरोध आणि दुष्काळी नेत्यांसाठी पार करावे लागणार अग्निदिव्य ! जयंतराव, विशाल, विश्वजित, सम्राट या सर्व नदीकाठच्या नेत्यांना आणि त्यांच्या सग्यासोयऱ्यांना बिनविरोधाची लॉटरी लागली. दुष्काळी कवठेमहांकाळ, तासगाव, जत भागांत निवडणूक होणार... लोक म्हणतात, ‘ह्यो कसला आलाय दुष्काळ, ह्यो तर नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांचा सुकाळ.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नुसते ‘जय हो’ म्हणण्यासाठी, नेत्यांच्या गाड्यांमागे धावण्यासाठी आणि त्यांच्या नातेवाइकांची निवड झाली की, फटाके फोडण्यासाठीच राजकारणात राहायचे का? निवडणुकीच्या काळात झेंडे उचलायचे कार्यकर्त्यांनी, घोषणा द्यायच्या, सतरंज्या उचलायच्या आणि संधी आली की नातेवाईक तुपाशी अन् कार्यकर्ते उपाशी, असं का बरं होतंय? सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने पुन्हा एकदा याच राजकीय पॅटर्नचे दर्शन घडवले आहे.
मुळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका निर्माण झाल्या त्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी; पण, या व्यवस्थेत नेत्यांची आणि त्यांचे अत्यंत जवळच्या नातलगांची पाची बोटे तुपात आहेत. सांगली जिल्ह्यातील सध्याच्या घडामोडीत जिल्हा बँकेची निवडणूक यासाठीच चर्चेत आली आहे. बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेची सूत्रे हाती घेतली. पक्षांची राजकीय ताकद बदलली, समीकरणे बदलली; पण जिल्ह्याच्या राजकारणातील जयंत पाटील यांचे वजन कायम राहिले. बँकेच्या सत्ताकारणात कित्येक वर्षे ते किंगमेकर आहेत.
काल जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात जी बैठक झाली त्यामध्ये जयंतरावातील ‘गॉडफादर’ हा धुरंदरपणे सर्व परिस्थिती हाताळत असताना दिसला. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत फोन केल्याने भाजपनेही बिनविरोधसाठी हात पुढे केल्याचे स्पष्ट झाले. चंद्रकांतदादांची यात कुणाला ठेवावे आणि कुणाला काढावे, या धर्मसंकटातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. यात राहिले ते दुष्काळातले नेते गोपीचंद पडळकर, संजय पाटील, अजितराव घोरपडे. दुष्काळ असल्याने बिनविरोधची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले गेले खरे; मात्र जिथे खरेच दुष्काळ आहे, तिथे मात्र निवडणूक लागली आहे. जयंतरावांनी ‘नावडते’ बाजूला ठेवल्याचे इथे स्पष्ट दिसते आहे.
राजकीय घराण्यांतील नावांची मांदियाळी लक्षवेधी आहे. जयंत पाटील यांचे पुतणे देवराज पाटील, स्वतः विश्वजित कदम आणि त्यांचे भाऊजी महेंद्र लाड; आमदार सुहास बाबर यांचे भाऊ अमोल बाबर, मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईक, शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर, सम्राट महाडिक यांचे बंधू राहुल, दिवंगत विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे, खासदार विशाल पाटलांच्या पत्नी पूजा, माजी आमदार विक्रम सावंत यांच्या पत्नी वर्षा, संग्राम देशमुखांची पत्नी अपर्णा ही यादी ठळक आहे.
हीच नावे का? याचे उत्तर आहे, बँकेवर या मंडळींना निर्विवाद वर्चस्व हवे आहे, कारण बँक ही शेती, उद्योगाचा प्रमुख अर्थवाहिनी आहे. यातील बहुतेक नेत्यांचे साखर कारखाने, उद्योग आहेत. त्यात कायदा वाकवून, मोडून हवा तसा कर्जपुरवठा या बँकेतून केला जातो. आजवरचा अनुभव तोच आहे. बाहेर राहून हे करणे शक्य होत नाही. त्यासाठी ‘बँकेत असावे लागते’, हेच खरे वास्तव आहे.
भाजपने शेपूट घातले :
भाजपनेही सुरुवातीला या बँकेसाठी स्वतंत्र लढण्याचा शड्डू ठोकला खरा; मात्र ‘गोकुळ’ च्या निकालानंतर यांच्या बाहुवरील बेंडकुळ्या गायब झाल्या. दुष्काळाचे गोंडस कारण पुढे करून भाजपने शेपूट घातले, हेच खरे. राज्यात, देशात सत्ता असताना बँकेत मात्र तडजोड करण्याची वेळ भाजपवर आली. कारण सहकारात आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व कायम आहे.
आता जयंतरांचे कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर रिंगणात आहेत. जयंतरावांचे निकटवर्ती संजयकाका, घोरपडे यांचेही अस्तित्व पणाला लागले आहे. माजी आमदार सुमनताई लढताहेत. रंगत निश्चित आहे. त्याचे निकाल काही लागोत, येणाऱ्या काळात शेतकऱ्याला सहज कर्ज उपलब्ध व्हावे आणि ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित रहाव्यात, कष्टकऱ्यांच्या मुलांना कर्ज काढून संचालकांना पैसे देऊन नोकरी मिळावावी लागू नये, एवढ्याच रास्त अपेक्षा आहेत. बाकी ‘सगेसोयरे’ कसा कारभार करतात, याकडे लक्ष असेलच. आत सारे एक असले तरी ‘बाहेर’ लक्ष ठेवायला सभासदांनी दक्ष राहावे, एवढीच अपेक्षा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.