
थोडक्यात बातमीचा सारांश :
सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केली असून तो जलजीवन मिशनसाठी काम करत होता.
त्याला केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप सरकारी कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्यामुळे इतर योजनांना आर्थिक अडचणी येत असल्याचं अनेक मंत्र्यांनी मान्य केलं आहे.
Sangli News : राज्यात सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक विभागाचा निधी वळवला जात आहे. यावरून विविध मंत्र्यांनी थेट नाराजी बोलून दाखवली आहे. तर विरोधकांसह सत्ताधाकरी ही लाडकी बहिणीमुळे तिजोरीवर लोड येत असल्याचे बोलत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून एका सरकारी कंत्राटदराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हा कंत्राटदार जलजीवन मिशनचे काम करत होता. पण वेळेवर त्याच्या कामाचा मोबदला न दिल्यानेच हे टोकाचे पाऊल त्यांचे उचलल्याचा आरोप आता सरकारी कंत्राटदार संघटनेकडून केला जात आहे. मृत सरकारी कंत्राटदराचे नाव हर्षल पाटील (ता. वाळवा तांदुळवाडी) असे आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राज्य सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना सुरू आहे. या योजनेतून सरकारी कामे केली जातात. तर या कामाचे कंत्राट सुशिक्षित बेरोजगार अभियंता, छोटे कंत्राटदार यांना दिले जाते. त्याचप्रमाणे कंत्राटदार हर्षल पाटील यांनाही काम मिळाले होते. त्यांनी सावकार व इतर आर्थिक लोकांकडून कर्ज घेऊन सरकारी कामं केलं होते. पण पुर्ण केलेल्या कामांचे देयके शासनाकडून भागवण्यात आली नाहीत. त्यांच्या कामाचे शासनाकडे जवळपास 1.40 कोटींचे देयके जवळपास 1 वर्षांपासून निधीच उपलब्ध नसल्याचे कारण देत थकवण्यात आली होती.
दरम्यान आता सरकारकडून वेळेत बिलं मिळत नसल्याच्या नैराश्यातून हर्षल पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांनी स्वत:च्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर आता सरकारवर सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून आरोपांसह टीका केली जातेय. तसेच राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदला वेळेत न मिळाल्यानेच कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जवळपास 1.40 कोटींचे देयके प्रलंबित
हर्षल पाटील त्यांचे शासनाकडे जवळपास 1.40 कोटींचे देयके प्रलंबित आहेत. तर वेळोवेळी मिळालेली कामाचे कंत्राट पूर्ण करण्यासाठी त्यांनी सावकार व इतर आर्थिक लोकांकडून कर्ज घेतले होते. जे जवळपास 65 लाखांचे झाले होते. एकीकडे शासनाकडून देयके थकवली जात होती. तर दुसरीकडे पैशासाठी सावकार व इतर आर्थिक लोकांकडून तगादा सुरू होता. यामुळे तो कंटाळला होता. तर सरकार पैसा देत नाही, लोकही तगादा लावत आहेत. आता वडिलांना काय सांगू? तुम्हीही काही सांगू नका. पण कामाचा मोबदला मिळाला नाही. कर्ज फिटलं नाही, तर मी आत्महत्या करेन, असे ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मित्रांना सांगत होते. अखेर त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
घरात मोठा अन् कर्ता
हर्षल हेच घरातील मोठा अन् कर्ता होता. आता त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक पाच वर्षांची मुलगी, दोन लहान भाऊ व आई वडील असा परिवार आहे. दरम्यान यावरून आता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी हर्षल यांनी केलेल्या कामाचे देय सरकारने लवकर त्यांच्या पत्नीच्या नावे वर्ग करावे. तसे न केल्यास शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे.
90 हजार कोटी रुपयांची देणी थकीत
दरम्यान शासनाने राज्यातील कंत्राटदारांची सुमारे 90 हजार कोटी रुपयांची थकीत देणी थकवली आहेत. यावरून देखील कंत्राटदारांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या कंत्राटदारांच्या संघटनेने राज्य सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. पण अजुनही सरकारकडून संघटनेला थांबा असेच उत्तर मिळाले आहे.
विचारले जाणारे प्रश्न :
1. हर्षल पाटील कोण होते?
– हर्षल पाटील हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी असून ते सरकारी कंत्राटदार होते.
2. आत्महत्येचं कारण काय आहे?
– जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप आहे.
3. लाडकी बहीण योजनेचा यामध्ये काय संबंध आहे?
– अनेक मंत्री व विरोधकांचं म्हणणं आहे की, या योजनेसाठी निधी वळवल्यामुळे इतर योजनांना निधी मिळत नाही, त्यामुळे वेळेवर मोबदला देणे शक्य होत नाही.
4. सरकारने यावर प्रतिक्रिया दिली आहे का?
– या घटनेवर अद्याप सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र कंत्राटदार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
5. या घटनेचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
– राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.