

Sangli News : सांगली जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या तयारीला वेग आला असून प्रत्येक्ष राजकीय पक्ष मैदानात उतरला आहे. येथे भाजपसह आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्ष प्रवेश घडवून आणण्यास सुरूवात केली आहे. तर पक्ष बळकटीकडेही विशेष लक्ष देताना जिल्हाध्यक्षांच्या निवडी देखील केल्या आहेत. पण मिरजेत सुरू असणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची खांदेपालटामुळे नेत्यांची धाकधूक वाढली आहे. तर आगामी स्थानिसाठी हातात कमळ, घड्याळ, धनुष्य बाण, हात घ्यायचे की तुतारी फुकांयची या विवंचनेत कार्यकर्ते दिसत आहेत. यामुळे मिरजेत होऊ घातलेल्या स्थानिकमध्ये आता चुरस पाहायला मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समितीसह महानगर पालिका आणि नगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. तर ऐन पावसाळ्यात निवडणूक लागण्याची शक्यता असून वातावरण चांगलेच तापण्यास सुरूवात झाली आहे.
तर प्रशासकीय पातळीवरही प्राथमिक तयारीही आता सुरू झाली असून अक्षरश: चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या इच्छुकांनीही मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. दरम्यान निवडणुकीत अधिक रंग भरण्यासाठी आता कार्यकर्त्यांचीही पळवापळवी सुरू झाली आहे. मिरज पूर्वभागातील अनेक गावात सध्या ‘ऑफर’ आणि ‘स्वीकार’ याचीच चर्चा सुरू आहे. महायुतीमधील घटक पक्षांकडून कार्यकर्त्यांना ओढण्यासाठी सुरू असलेल्या घडामोडीत नेत्यांतही धाकधूक वाढली आहे.
गत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढल्या गेल्या होत्या. आताही हाच फॉर्म्युला असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुती म्हणूनच निवडणुका लढवल्या जाणार असल्याचेही संकेत दिलेत. पण जेथे तसे शक्य नाही तेथे स्वबळाचा नाराही दिला आहे. यामुळे भाजप सांगली जिल्ह्यासह पूर्ण तयारी करताना दिसत आहे.
तर प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच इतरही पक्ष आणि छोटे-मोठे गट देखील आपले प्राबल्य वाढवताना दिसत आहेत. यात आघाडीवर जनसुराज्य शक्ती पक्ष असून प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी ग्रामीण भागातील महत्त्वाचे कार्यकर्ते आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीनेही गावोगावी मेळावे घेत ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीसह ‘जनसुराज्य’मधील ‘इनकमिंग’मुळे साहजिकच उमेदवारी वाटपावेळी महायुतीत स्पर्धा रंगणार आहे. याआधीच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. मात्र आता ती स्थिती नाही. महायुतीतर्फे भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, रिपब्लिकन पक्षालाही सामावून घेतच निर्णय घ्यावा लागणार आहे.
भाजपची सर्व सूत्रे आमदार सुरेश खाडे यांच्या हाती असतील. निवडणुका जाहीर होतील तेव्हा बघू, याच मूडमध्ये सध्यातरी भाजपमधील शीर्षस्थ आहेत. त्यामुळे हळूहळू पक्षप्रवेशाची गती वाढत असल्याने नियोजनातील ‘चाणक्य’ मात्र सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. या महिनाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आणि चार महिन्यांत प्रत्यक्षात निवडणुका होणार असल्याने आता सर्वच पक्षांनी आघाडी उघडली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांगली जिल्ह्यात बळ देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या निशिकांत दादा पाटलांना अजित पवार यांनी पुन्हा बळ देण्याचे काम केलं आहे. त्यांनी निशिकांत पाटील यांची पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. यामुळे आगामी स्थानिकसाठी राष्ट्रवादीच्या रणनीती अधिक गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.
मिरज पूर्वभाग हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण येथे लोकसभा निवडणूक वगळता मागील सर्व निवडणुकांत काँग्रेस अडखळताना दिसत आहे. आतातरी जनतेला गृहीत धरणे बंद करून महाविकास आघाडीचे नेते निवडणुकीत ‘आघाडी’ घेतात का, हे पाहावे लागणार आहे.
आगामी स्थानिकच्या तोंडावर अनेक स्थानिक नेते सत्तेवर स्वार होण्यासाठी महायुतीच्या वाटेवर आहेत. पण सत्ताधारी पक्षात होणाऱ्या प्रवेशांमुळे आगामीत स्थान मिळणार का? याचीच चिंता सध्या अनेक इच्छुकांना लागली आहे. तर हातात कमळ, घड्याळ, धनुष्य बाण, हात की तुतारी घ्यायची असाही गोंधळ अनेक कार्यकर्यांमध्ये दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.