

विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महायुतीला पाच जागा मिळाल्या. २०१४ च्या निवडणुकीत असेच यश महायुतीला मिळाले होते. भाजपला चार आणि शिवसेनेला एक अशा जागा जिंकल्या होत्या त्याची पुनरावृत्ती 2024 च्या निवडणुकीत झाली. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत सत्ता आणणे हे महायुतीचे लक्ष्य आहे. लाडक्या बहीणींमुळे महायुतीचा पेपर सोपा झाला आहे. शिवाय म्हैसाळ टेंभू योजनेने महायुतीला बळ मिळाले आहे. त्याचा फायदा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
सध्या सांगली जिल्हा परिषदेत गेले दोन वर्षे प्रशासकराज चालू आहे. सभागृहाची मुदत 20 मार्च 2022 रोजी संपली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रशासक पदाची जबाबदारी आली. तेव्हापासून जिल्हा परिषदेत सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे सगळी सत्ता अधिकाऱ्यांच्या हाती एकवटली आहे. गेल्या दोन वर्षात विकास कामांना निधी मिळत असला तरी कामे संथ गतीने सुरू असल्याचा फटका बसत आहे. त्यामुळेच गतवर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्याची जलजीवन मिशन योजना अजूनही जवळपास निम्मी अपूर्ण आहे.
पदाधिकारी आणि सदस्य नसल्यामुळे प्रशासनाचा जनतेशी संवाद तुटल्यासारखी परिस्थिती आहे. एकमेव जमिनीची बाजू म्हणजे जितेंद्र डूडी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना सुरू झालेली मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएचसी योजना राज्यासाठी आदर्श ठरले आहे. त्यामुळे ही योजना राज्यभरात राबवण्याची हालचाल सुरू आहे. या दोन योजना वगळता प्रशासकराजमध्ये नाविन्यपूर्ण कामे झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी आणि सदस्य असणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले आहे.
दुसरीकडे न्यायालय प्रक्रियेत अडकलेला ओबीसींसाठीचा (OBC) राजकीय आरक्षणाचा प्रश्न या महिन्यात सुटण्याची आशा आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत बुथ यंत्रणा सक्षम केल्याचा फायदा भाजपला दिसून आला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) जिल्ह्यात चार जागा मिळाल्या. तर शिवसेनेला एक जागा मिळाली एकूण महायुतीला पाच जागा पदरात पडल्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याच्या त्यांच्या आशा जागृत झाल्या आहेत. २०१७ च्या निवडणुकीत महायुतीला जिल्हा परिषदेत सत्ता मिळाली होती. त्यामुळे यावेळीही त्याची पुनरावृत्ती करण्याची महायुतीची रणनीती आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनाही भाजपला लाभदायक ठरली होती. हीच योजना जिल्हा परिषद निवडणुकीतही फायदेशीर ठरू शकते. शिवाय बूथ सक्षम करण्याच्या निमित्ताने भाजपने स्थानिक कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना केल्या आहेत. या निमित्ताने भाजप जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे.
तुलनेने जिल्हा परिषदेत यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी किती जागा दाखवणार हे थोडे शंकास्पद आहे. जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि रोहित पाटील हे तीनच महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले. यामध्ये जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांचे घटलेले मताधिक्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी चिंता वाढवणारे आहे.
बलराज पवार यांनी (विस्तृत माहिती दिली)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.