
Kolhapur News : कोल्हापुरने शिवसेनेला फक्त बळच दिले नाही तर एकेकाळी तीन आमदाराही दिले. येथील निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वतःच रक्त देऊन शिवसेना टिकवली, पक्ष विस्तारासाठी अंगावर लाट्या काट्या झेलल्या. त्याचे फलित म्हणून अलीकडच्या काळात शिवसेनेला सहा आमदार आणि दोन खासदार कोल्हापूरकरांनी दिले. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ठाकरेंच्या शिवसैनिकांनीच आता पक्ष दावणीला बांधला आहे. स्वतःच्या खुर्चीसाठी पक्षाची नाहक बदनामी सुरूच आहे. केवळ खुर्ची मिळवण्यासाठी पक्षातीलच पदाधिकाऱ्यांवर यापूर्वी अंतर्गत कुरघोडी व्हायची, पण आता उघड उघड होताना दिसत आहे. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच विरोध होऊ लागला आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. गळ्यात गळे आणि खांद्यावर हात ठेवून लढण्याची वेळ असताना एकमेकांच्या पायात पाय घालण्याचे धाडस याच पदाधिकाऱ्यांच्या मध्ये निर्माण झाले आहे.
शिवसेना स्थापना झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा पहिला नगरसेवक होण्याचा मान चंदू साळुंखे यांना मिळाला. एकापासून उमेदवारी डावल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना शिवाजी चव्हाण, रामभाऊ चव्हाण, बाळ घाटगे, धनाजी बिरंजे अशा निष्ठावंत शिवसैनिकांनी कोल्हापुरात शिवसेना रुजवली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे या शिवसैनिकांनी शिवसेना केवळ रुजवलीच नाही तर दिलीप देसाई यांना एक वेळ, तर सुरेश साळुंखे यांना दोन वेळा असे सलग तीन वेळा आमदारपद मिळवून दिले. याच काळात शिवसेनेचा देखील विस्तार कोल्हापूर जिल्ह्यात झाला. नंतरच्या काळात शिवसेनेला सहा आमदार आणि दोन खासदार मिळाले.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत शाखाप्रमुखाला अधिक महत्त्व आहे. शाखाप्रमुख म्हणेल तोच आदेश शिवसैनिक मानत होते. पण जसजसा कोल्हापूर जिल्ह्यातील शाखा वाढल्या तसतसे नवनवीन शाखाप्रमुख निर्माण झाले. एकमेकांच्या वर्चस्व वादातून शिवसेनेच्या मूळ ढाच्याला तडा गेला. त्यातून जिल्हावार प्रमुख नेमण्यात आले. पक्षात पदांची खिरापत सुरू झाली. निष्ठावंत शिवसैनिक आणि पक्ष विस्ताराच्या नावाखाली जिल्ह्यात तीन-तीन जिल्हाप्रमुख निर्माण झाले. आशातूनच या जिल्हाप्रमुखांमध्ये पुन्हा वर्चस्ववाद निर्माण झाला. सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत वाद नेहमीच चव्हाट्यावर येत राहिला आहे. वर्चस्व वादातून कोल्हापुरातील शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सध्याचे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यात वाद निर्माण झाल्याने दोन गट पडले. सध्या क्षीरसागर हे शिंदे गटासोबत सक्रिय आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेची वाटचाल उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखालीच सुरू आहे. त्यांना उपनेतेपदावर बढती मिळाल्यानंतर जिल्हाप्रमुख पद खाली आहे. या पदासाठी आता काही पदाधिकारी इच्छुक आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पदाधिकाऱ्यांमध्येच खटके उडाल्याचे सांगितले जात होते. त्याचा प्रत्येक आता होणाऱ्या विविध आंदोलनात दिसून येत आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सह संपर्कप्रमुख विजय देवणे आहेत त्या ठिकाणी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले उपस्थित नसतात. ज्या ठिकाणी रविकरण इंगवले असतात तेथे पवार आणि देवणे उपस्थित नसतात. यापूर्वी अंतर्गत विषय हे पडद्यामागे राहायचे. मात्र आता ते पडद्यासमोर येऊ लागल्याने ठाकरेंच्या गटात देखील ठिणगी पडल्याचे जग जाहीर झाले आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना जिल्ह्यातील दोन नंबर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र आता त्यालाच पक्षातीलच पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत आहे. दोन नंबरच्या व्यवसाय करणाऱ्यांनीच आता पोलीस प्रमुखांना निवेदन द्यावे, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्याकडून आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षांतर्गत वाद पुढे आला आहे.
शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांना बढती मिळाल्यानंतर कोल्हापूर उत्तर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुख पदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, विराज पाटील, राजू यादव, हर्षल सुर्वे, अवधूत साळुंखे यांनी दावा केला आहे. मात्र इंगवले यांच्या नावाला काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा अंतर्गत वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.