
राजकीय मतभेद असूनही ॲड. उदयसिंह पाटील आणि ॲड. राजाभाऊ उंडाळकर हे एकाच व्यासपीठावर आले.
हा प्रसंग खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत उंडाळे येथील शामराव पाटील पतसंस्थेच्या एका कार्यक्रमात घडला.
खासदार पाटील यांनी ‘एकत्र रहा’ असा सल्ला दिला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तुमच्या मदतीला येतील असा शब्द दिला.
कऱ्हाड : हेमंत पवार
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे सलग 35 वर्षे प्रतिनिधीत्व करुन राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्याचे मंत्रीपद भुषवलेले माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि रयत कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांचे चिरंजीव ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील उंडाळकर यांचे अनेक वर्षे वैर राहिली. (NCP leaders Adv. Udaysingh Patil and Adv. Anandarao alias Rajabhau Undalkar came together on a single platform)
मात्र राजकारणात काहीही होवु शकते यानुसार बऱ्याच राजकीय मतभेदानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील व ॲड. आनंदराव उर्फ राजाभाऊ उंडाळकर हे चुलत बंधू एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होते सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमाचे. यावेळी खासदार पाटील यांनी दोन्ही बंधुंना एक राहण्याचा सल्ला देवुन उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला मदत करतील असा शब्दही दिला.
माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी जेष्ठ नेते (कै) यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यानुसार आयुष्यभर काँग्रेसचे विचार घेवुन वाटचाल केली. त्याचा पगडा त्यांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यावर होता. ते ही काँग्रेसचे निष्ठावंत होते. त्यादरम्यान जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि कऱ्हाड दक्षिणध्ये बस्तान बसवण्यासाठी रयत कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि (कै) उंडाळकर यांचे बंधु जयसिंगराव पाटील यांचे चिरंजीव अॅड. राजाभाऊ उंडाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पक्षाकडे वळवले. त्यामुळे उंडाळकर घराण्यात फुट पडली.
पुढे त्या दोघांनी कारखाना, जिल्हा परिषद व अन्य छोट्या-मोठ्या निवडणुका लढवल्या. मात्र त्या निवडणुकांवर (कै) विलासकाका उंडाळकर यांच्या रयत संघटनेचे वर्चस्व राहिले. त्यानंतर बराच काळ दोन्ही सख्खे चुलतभाऊ एकमेकांच्या विरोधात राहिले. त्यादरम्यान पुलाखालुन बरेच पाणी वाहिले. त्यावेळपासुन अॅड. राजाभआऊ उंडाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिले. (कै) विलासकाका उंडाळकर यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालवणारे अॅड. उदयसिंह उंडाळकर यांनी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी यासाठी काही निर्णय घेतले.
त्याअंतर्गत त्यांनी मध्यंतरी काँग्रेसच्या विचारांशी साधर्म्य असलेल्या राज्याच्या सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत कऱ्हाडमध्ये जाहीर प्रवेश करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे दोन्ही उंडाळकर बंधू एकाच पक्षात आले.
उंडाळे येथील एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील हे येणार होते. त्यादरम्यान पक्षाचे नेते म्हणून अॅड. उदयसिंह उंडाळकर यांच्यासह अॅड. राजाभाऊ उंडाळकर यांनीही निमंत्रण देण्यात आले होते. दोन्ही बंधुनी एकमेकाबद्दल आकस न बाळगता खासदारांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रदिर्घ कालावधीनंतर दोन्ही उंडाळकर बंधु एकत्र आल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी खासदार नितीन पाटील यांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना संधी आपोआप चालून येते. त्यासाठी कोणीतरी मागे पुढे सरकण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. राजकारणात भांडत बसण्यापेक्षा एकत्र राहून काम करावे. उंडाळकर कुटुंबाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एकीने काम केल्यास तुमच्या राजकीय जीवनात याचा फायदा होईल असा सल्ला त्यांनी दोन्ही उंडाळकर बंधूना दिला.
दरम्यान पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी दोन्ही बंधूनी एकीने काम करत स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांचा वारसा जोपासणे आवश्यक आहे. दोन्ही बंधूंनी एकत्रित रित्या काम केल्यास गतवैभव प्राप्त होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहिजे ते सहकार्य करतील असा शब्द दिला.
कार्यक्रमात ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि आनंदराव पाटील-उंडाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते दोघे एका व्यासपिठावर आल्यामुळे काहीतरी राजकीय भाष्य करतील अशी उपस्थितांनी आशा होती. मात्र दोघांनीही राजकीय मतभेदावर भाष्य करणे टाळले. मात्र उंडाळेतील बळवंत पाटील यांनी ॲड. राजाभाऊ उंडाळकर आणि ॲड. उदयसिंह उंडाळकर एका व्यासपीठावर आले असून हा योग चांगला आहे. भविष्यात अशीच एकजूट राहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सूतोवाच केले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट केला.
प्र. उदयसिंह पाटील आणि राजाभाऊ उंडाळकर यांच्यात वाद होता का?
उ: हो, दोघांमध्ये राजकीय मतभेद होते आणि ते विविध गटांमध्ये कार्यरत होते.
प्र. दोघे एकत्र का आले?
उ: सातारा जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत एकत्र आले.
प्र. अजित पवार यांनी काय आश्वासन दिलं?
उ: खासदार नितीन पाटील यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी दोघांनाही राजकीय आणि विकासाच्या बाबतीत मदत केली जाईल, असा शब्द दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.