

Satara news : साताऱ्यातील पसरणे येथील शाहीर साबळे प्रतिष्ठानातील एका बिहारी युवकाच्या कामावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी प्रतिष्ठानला भेट दिल्यानंतर तेथील परिस्थितीबाबत केलेल्या पोस्टवर शाहीर साबळे यांच्या कन्या आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर डॉ. पवार यांनी पुन्हा स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली आहे.
डॉ. पवार यांच्या म्हणण्यानुसार, प्रतिष्ठानला भेट दिल्यानंतर त्यांनी तेथे गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या एका बिहारी युवकाची भेट घेतली. दोन वर्षे काम करूनही संबंधित युवकाला मराठी बोलता येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महाराष्ट्राच्या (Maharashtra) सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती असलेल्या शाहीर साबळे यांच्या स्मारकात काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या कार्याची माहिती आणि स्थानिक भाषेचा परिचय असणे अपेक्षित असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
‘16 हजार रुपयांच्या पगारासाठी स्थानिक मराठी युवक मिळाला नसता का?’ असा सवाल डॉ. पवार यांनी उपस्थित केला आहे. शाहीर साबळे यांच्या स्मारकाच्या व्यवस्थापनात आणि दैनंदिन कामकाजात मराठी माणसांचा (Marathi language) अधिक सहभाग असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, डॉ. पवार यांच्या पोस्टवर वसुंधरा साबळे यांनी आक्षेप घेतला होता. या विषयाची संपूर्ण माहिती न घेता पोस्ट करण्याऐवजी पवार यांनी साबळे कुटुंबाशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती, असे त्यांनी म्हटले. पोस्टमुळे साबळे कुटुंबाची बदनामी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच प्रतिष्ठानवर सध्या दुसऱ्याच व्यक्तीने जम बसवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
या आरोपांवर स्पष्टीकरण देताना डॉ. पवार यांनी आपली पोस्ट कोणत्याही व्यक्ती किंवा कुटुंबाची बदनामी करण्याच्या उद्देशाने केली नसल्याचे स्पष्ट केले. शाहीर साबळे यांच्याबद्दल असलेल्या आदर आणि प्रेमातूनच हा मुद्दा उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. ‘महाराष्ट्रगीताला आपल्या आवाजाने घराघरात पोहोचवणाऱ्या शाहीर साबळे यांच्या स्मारकात काम करण्यासाठी स्थानिक मराठी व्यक्ती उपलब्ध होऊ नये, ही बाब खेदाची आहे,’ अशी भूमिका पवार यांनी मांडली.
शाहीर साबळे यांच्या स्मारकाची जबाबदारी आणि व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. साबळे कुटुंबातील सक्षम व्यक्तींनी आपल्या प्रभावाचा वापर करून प्रतिष्ठान अधिक चांगले आणि देखणे करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तसेच स्मारकाच्या व्यवस्थापनात आणि कामकाजात मराठी माणसांचा अधिक सहभाग असावा, असे पवार यांनी म्हटले आहे. हा विषय व्यापक पातळीवर जावा आणि साताऱ्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, डॉ. पवार आणि वसुंधरा साबळे यांच्या भूमिकांमुळे शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या व्यवस्थापनाबरोबरच स्थानिक रोजगार, मराठी भाषेचा वापर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनाचा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.