Satara ZP : मोठी बातमी : सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष; जयकुमार गोरे-शिवेंद्रराजेंनी शेवटच्या क्षणी गेम फिरवला, राष्ट्रवादीचे सदस्य फुटले
Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायकरित्या भाजप उमेदवार प्रिया शिंदे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपचेच राजू भोसले विजयी झाले आहेत. शेवटच्या क्षणी सभागृहात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फुटल्याने बहुमत नसतानाही भाजपच्या प्रिया शिंदे यांचा विजय झाला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास बाकी असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र ही निवडणूक लढणार असल्याची घोषणा मंत्री शंभुराज देसाईंनी केली होती. भाजपला बाजूला ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. पण मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांना फोडत ऑपरेशन लोटस यशस्वी करून दाखवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अशोकराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने अध्यक्षपदासाठी कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांना उमेदवारी दिली होती. प्रिया शिंदे या भाजपच्या राज्य उपाध्यक्ष असून त्या खटाव जिल्हा परिषद गटातून भाजपकडूनच निवडून आल्या आहेत.
65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या सर्वाधिक 27 जागा निवडून आल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने निवडणूक पूर्व आघाडी केली होती. या आघाडीतील राष्ट्रवादीला 20 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानीच्या एका सदस्यानेही राष्ट्रवादीसोबतच गटनोंदणी केली आहे. असे मिळून या आघाडीकडे 36 चे संख्याबळ होते. बहुमतापेक्षा हा आकडा दोनने जास्त होता.
भाजपने विशेषतः मंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत मित्रपक्षांना फारशी किंमत दिली नव्हती. त्यावरून मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. आता निकालानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपला वगळून सत्ता स्थापन करावी अशी भूमिका घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

