

भाजप-शेकाप युतीमुळे माजी आमदार शहाजीबापू पाटील नाराज झाले असून, त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर खुलेआम टीका केली.
सांगोल्यावर गुलामगिरी लादली गेल्याचा आरोप करत शहाजीबापूंनी कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न उपस्थित केला.
दीपक साळुंखे यांच्यावरही त्यांनी उपहासात्मक शैलीत जोरदार शब्दात निशाणा साधला.
Sangola, 23 November : भाजपने शेकापशी युती करून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना नगरपालिका निवडणुकीत डावललं. त्यामुळे संतापलेल्या शहाजीबापूंनी आज (ता. २३ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना धू धू धुतले.
आज आपल्याला गुलाम बनवलंय. सांगोल्याच्या राजकारणानं आज वेगळं वळण घेतलंय. हेलिकॉप्टरनं यायचं आणि मिलिटरीच्या माणसासारखं भाषण ठोकायचं, दमदाटी करायची. धाड धाकदपटशा दाखवायचा. चालंलय का नेमकं हे. निवडणूक लढवायला आला आहात की आमच्यावर गुंडगिरी करायला आला इथं, अशा शब्दांत शहाजीबापूंनी (ShahajiBapu Patil) गोरेंवर फायरिंग केली.
सांगोला (Sangola) नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनेलच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री शिंदे हे सोलापूरला आले होते. सांगोल्यातील सभेत बोलताना त्यांनी पालकमंत्री गोरेंवर जोरदार हल्लाबोला केला.
ते म्हणाले, आज आपल्याला गुलाम बनवलं आहे. इंग्रजांनी गुलाम बनवलं, त्यापेक्षा मोठी गुलामगिरी सांगोला तालुक्यावर आली आहे आणि हाच आपल्याला धोका आहे. (स्व.) भाई गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू पाटील आम्ही दोघांनी सांगोल्याचा स्वाभिमान जीवंत ठेवला होता. आमचा सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा ताठ मानेने चालत होतं, असं आमचं राजकारण होतं.
शेकापकडून मारुती बनकरांची उमेदवारी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी जाहीर केली होती की मी आनंदा मानेंची उमेदवारी जाहीर केली होती. हे तुम्ही सर्वांनी सांगावं. शेतकरी कामगार पक्षानं बैठक घेऊन नगराध्यक्षपदासाठी मारुती बनकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि जयाभाऊ नावं मला ठेवता. माझ्या कार्यालयाशेजारहून तुमच्या गाड्या बाळासाहेब एरंडेंच्या बंगल्यावर जातात. आमच्या गरीबाच्या घरी, त्या ऑफीसमध्ये तुम्हाला कोरा चहा तर मिळाला असता ना? सारखंच चवदार जेवण करायला तिकडं का पळता?
सांगोला शहरासाठी, माझ्या हट्टापायी एकनाथ शिंदे यांनी दोनशे कोटी रुपये दिले होते. त्याची दयामाया दाखवायची असेल, आपल्याला दिलेल्या निधीची परतफेड करायची असेल तर धनुष्यबाणाच्या चिन्हाच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहनही शहाजीबापू पाटील यांनी केले.
दीपक साळुंखेंची उडवली खिल्ली
दीपकआबा साळुंखे पाटील तुम्ही आजपर्यंत आई बापाचं नाव घेऊन गुलाबजामून आणि बासुंदीच खात आला आहात. आता कुठं जरा वाळं खायची वेळ आली तर की आजारी असूनसुद्धा सलाईन लावून गडी बाळासाहेब एरंडेंच्या बंगलावर पळत सुटतोय. काय आमदार आणि काय दीपकआबा? असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी दीपक साळुंखे यांची खिल्ली उडवली.
प्र.१: शहाजीबापू भाजपवर का नाराज झाले?
उ: युती करून त्यांना निवडणुकीत डावलल्यामुळे ते नाराज झाले.
प्र.२: त्यांनी कोणावर सर्वाधिक टीका केली?
उ: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांच्यावर.
प्र.३: शहाजीबापूंनी कोणत्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांची भावना जागृत केली?
उ: सांगोल्याच्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर.
प्र.४: शहाजीबापूंनी मतदारांना काय आवाहन केले?
उ: धनुष्यबाण चिन्हाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.