
Solapur, 08 September : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांकडून त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघावर सध्या महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. पण, पदवीधर मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे, तर शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना इच्छूक आहे. त्यातूनच शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुणे पदवीधर भाजपने घ्या आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा’, अशी मागणी शिक्षकांच्या मेळाव्यात बोलताना केली. त्यामुळे महायुतीमध्ये मात्र वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
सोलापूरमध्ये रविवारी (ता. ०७ सप्टेंबर) शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, महायुतीच्या नेत्यांकडे आम्ही अशी मागणी करू की, पुणे पदवीधर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा. हे शंभर टक्के होतंय, त्याला कारणं आहेत, असे सांगून मंगेश चिवटे यांना हात धरून पुढे ओढत हे ‘इतकं चलाख आहे. अजितदादा म्हणणार मंगेश आमचाच, फडणवीससाहेब म्हणणार आमचाच. एकनाथ शिंदेसाहेब तर आपलेच आहेत, असे सांगून त्यांनी शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मंगेश चिवटे इच्छूक असल्याचेही सांगून टाकले.
पुणे शिक्षक मतदारसंघातून ( Pune teachers constituency) काँग्रेसचे जयंत आसगांवकर, तर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड हे निवडून आले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झालेली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे प्रकाश जावडेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव करून पुणे पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे सत्तेतील दोन्ही प्रमुख पक्षांचा पुणे पदवीधर मतदारसंघावर दावा राहणार आहे. शिक्षक मतदारसंघात मात्र आजपर्यंत पक्षीय पातळीवर निवडणूक न होता उमेदवाराच्या संपर्कावर निवडणूक झालेल्या आहेत. या मतदारसंघात रयत आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची ठरते.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी थेट दोन्ही मतदारसंघाची वाटणी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला काय येणार, हा खरा प्रश्न आहे. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. मध्यंतरी भाजपकडून लाड कुटुंबीयांना पक्षात घेण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र, आमदार लाड यांच्या एका अटीमुळे तो प्रवेश लांबला असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पदवीधर मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. कारण या मतदारसंघातील विजयी झालेला उमेदवार हा राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या तत्वानुसार राष्ट्रवादीकडून पुणे पदवीधर मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.