
कोल्हापूर : राज्य सरकारने 21 जिल्ह्यांमध्ये 65 बाजार समिती नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वाधिक आठ बाजार समित्यांची निर्मिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे. पण या आठपैकी बहुतांश बाजार समित्यांमध्ये भात आणि ऊस अशी दोन-तीन पिकेच येतात. त्यामुळे या बाजार समित्या म्हणजे केवळ कार्यकर्त्यांचीच सोय ठरण्याची शक्यता आहे. यातच पन्हाळा आणि शाहुवाडी बाजार समितीचाही समावेश होतो.
सध्या शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार आहे. मात्र आता शाहुवाडी आणि पन्हाळा अशा दोन तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती होणार आहेत. हे दोन्हीही तालुके एकाच विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे येथील बाजार समित्यांच्या रचना होताना चेअरमन आणि संचालक निवडीत लोकांना चुरस अनुभवायला मिळणार आहे.
मलकापूर येथे बाजार समितीची सुमारे 7 एकर मालकीची जमीन आणि इमारत आहे. त्यामुळे याच ठिकाणी नवीन बाजार समितीची रचना होण्याची शक्यता आहे. मलकापूर, बांबवडे या तालुक्यातील मुख्य बाजारपेठा आहेत. यात व्यापारी, अडते, उत्पादक, हमाल, दलाल, असे सभासद आहेत.
तालुक्यातील राजकीय बलाबल पाहता जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे आणि गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांची युती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील सरुडकर आणि मानसिंगराव गायकवाड यांची युती आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत शाहुवाडी तालुक्यातून दोन्ही गटांचा प्रत्येकी एक संचालक निवडून आल्याने आज घडीला दोन्हीही गट तुल्यबळ आहेत. त्यामुळे नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रचनेत दोन्हीही गट एकमेकांना पुरुन उरणार आहेत.
ही बाजार समिती नव्याने निर्माण झाल्यास समितीच्या निवडणुकीमध्ये देखील तितकीच चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पन्हाळा-शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते या दोन तालुक्यात विभागल्याने दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी या बाजार समितीचा उपयोग होणार आहे.
या बाजार समितीचे कार्यक्षेत्र कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येत आहे. त्यामुळे सहाजिकच आमदार कोरे यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राजकीय पकड मजबूत केली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये काही मोजक्याच कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. मात्र प्रत्येक तालुक्यात आता समिती होत असल्याने अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे कोरे आणि सरुडकर या दोघांनाही कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट करण्यासाठी या बाजार समितीचा फायदा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.