ॲड. यशवंतदत्त बेंद्रे
Satara News, 25 Oct : तारळे जिल्हा परिषद गट आणि मुरुड पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली असली, तरी तारळे गण खुला झाल्याने दिग्गजांचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, गणात इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे.
पक्षापेक्षा यंदाही पालकमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध विक्रमसिंह, सत्यजितसिंह पाटणकर गट असा पारंपरिक संघर्ष पाहायला मिळणार आहे. तारळे जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. येथे टोकाचा राजकीय संघर्ष असतो.
काठावरील जय-पराजय येथील वैशिष्ट्य आहे. परिणामी, मोठी राजकीय चुरस दाखवणारा तारळे परिसर देसाई गटाचा म्हणजे शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई विधानसभेवेळी तारळे गटातून कायम पाच हजारांच्या वर मताधिक्य घेत आले आहेत.
2007 पर्यंत तारळे गट, गणासह मुरुड गणावर देसाईंचे निर्विवाद वर्चस्व होते. देसाईंचा बालेकिल्ला असतानाही गत दोन निवडणुकीत येथे पाटणकर गटाची सरशी झाली होती. 2012 च्या निवडणुकीत पाटणकर गटाचे सदाभाऊ जाधव यांनी मंत्री देसाईंचे बंधू रविराज देसाई यांचा तारळे गटात पराभव केला. हा पराभव शंभुराज देसाईंसाठी प्रचंड धक्कादायक होता.
त्याचवेळी गणात देसाई गटाचे रामभाऊ लाहोटी केवळ दोनशे मतांनी विजयी झाले, तर मुरुड गणात पाटणकर गटाच्या आरती पन्हाळे या विजयी झाल्या होत्या. आता त्यावेळेचे जायंट किलर सदाभाऊ जाधव आज देसाई गटातच आले आहेत. त्यामुळे देसाई गटाची बाजू भक्कम झाली आहे.
2017 च्या निवडणुकीत मंत्री देसाईंचे सेनापती अशी ओळख असलेले रामभाऊ लाहोटी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सौभाग्यवती सावित्रा लाहोटी यांनी तारळे गणातून निवडणूक लढवली होती. त्याचबरोबर तारळे गटात व मुरुड गणात उमेदवार उभे केले होते. त्यामुळे देसाई गटासाठी सोपी असलेली निवडणूक भाजपच्या उमेदवारांमुळे अवघड बनली अन् तिन्ही ठिकाणी देसाई गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला.
हा पराभव देसाई गटाला जिव्हारी लागला होता. येथील पराभवामुळे पंचायत समिती सत्ता हातातून निसटली होती. रामभाऊ लाहोटी व भाजपला हलक्यात घेणे त्यावेळी देसाई गटाला महागात पडले होते, तसेच बाळासाहेब खबाले-पाटील यांचा झंझावात होता. राष्ट्रवादीच्या संगीता खबाले-पाटील या तारळे गटातून पाच हजारांच्या फरकाने निवडून आल्या होत्या. आता तेही देसाई गटात आहेत.
गत आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सदाभाऊ जाधव व बाळासाहेब खबाले-पाटील, नामदेवराव साळुंखे यांनी देसाई गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे देसाई गटाची ताकद प्रचंड वाढली आहे. सध्या तारळे गटातील अपवाद वगळता सर्व ग्रामपंचायत व सोसायट्यांवर देसाई गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे देसाई गटाच्या उमेदवारांना चांगली संधी आहे. ते सहज विजयी होतील, अशी स्थिती आहे.
सत्यजितसिंह पाटणकरांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते अन् पाटणकरांच्या कार्यकर्त्यांचे अजूनही मनोमिलन झाल्याचे दिसून येत नाही. त्यातूनच विक्रमबाबा पाटणकर यांनी हातावर घड्याळ बांधले. एकंदर पाटणकर गट म्हणजे भाजपची येथे नाजूक स्थिती आहे.
त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना डोंगराशी टक्कर घ्यावी लागणार आहे. यावेळी धनुष्यबाण अचूक लक्ष्य भेद करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरतो की पुन्हा एकदा पाटणकर गट जोर का धक्का धीरे से देतो, हे आगामी काळच ठरवणार आहे. तारळे गट व मुरुड गणात संभाव्य उमेदवारांच्या घरातील महिला असण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.