

Satara, 20 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज (ता. 20 मार्च) हायव्होल्टेज ड्रामा झाला. राष्ट्रवादी-शिवसेनेची पाच मते फोडून भाजपने आपला जिल्हा परिषद अध्यक्ष बसवला. या वेळी धक्काबुकी, झोंबाझोबीचे प्रकार घडले, त्यातच कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. या संपूर्ण प्रकरणानंतर मंत्री देसाई यांनी भाजपला खणखणीत इशारा देताना ‘या प्रकरणाचे तीव पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटतील, हा विषय आम्ही थेट कॅबिनेटपर्यंत नेणार आहोत,’ असे म्हटले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara) निवडणुकीत भाजपने २७ जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी २०, शिवसेना १५, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येका एक याप्रमाणे संख्याबळ होते. भाजपला बहुमतासाठी सहा जागा कमी हेात्या. मात्र, आज सर्व अस्त्रांचा वापर करत भाजपने अध्यक्षपदी प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली.
सातारा जिल्हा परिषदेत घडलेला हायव्होल्टेज ड्रामा मंत्री शंभूराज देसाई () यांनी ए टू झेड सांगितला आहे. ते म्हणाले, शिवसेना-राष्ट्रवादीचे ३३ सदस्य आमच्यासोबत मतदानाला आले होते. आमचे बापूसाहेब शिंदे यांचे आमच्यातील दोन सदस्यांनी अपहरण केले, अशी खोटी तक्रार दाखल केली. त्या वेळी शिंदे यांनी पहाटे पाच वाजता पोलिस ठाण्यात जाऊन माझं कोणी अपहरण केलं नाही. त्यांचा खून करण्याचा प्रयत्न होता, असा खोटा आरोप करण्यात आला होता.
बापूसाहेब शिंदे यांनी स्वतः वाई पोलिस ठाण्यात जाऊन माझा अपहरण झालेले नाही. मी माझ्या पक्षासोबत आहे, असे सांगितले. आमच्याच युतीमधील दोन सदस्यांना आरोपी करण्यात आले. आम्ही आतमध्ये गेलो. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांना गेटवरच दमदाटी करण्यात आली. कांबळे यांना मी आतमध्ये घेऊन जात असताना मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी स्वतः त्यांना ओढले, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि फिरोज पठाण हे आमध्ये आले होते. कांबळेला आतमध्ये आम्ही नेऊन सोडलं. त्यानंतर आम्ही बाहेर थांबलो. त्यांनी भाजपच्या बाजून हात वर केला नव्हता, शेजारच्या सदस्यांनी त्यांचा हात धरून वर करण्यात आला. म्हणजे सातारचे प्रशासन लोकशाहीचे खून करणारे आणि गळा घोटणारे आहे.
अपहरणाचा आरोप केलेल्या दोन सदस्यांपैकी संदीप मांडवे याला मी हाताला धरून सभागृहात नेत होतो, त्यावेळी मला दहा दहा पोलिस ओढत होते. मी पालकमंत्री, राज्याचा मंत्री आहे तरीही मला पोलिस धरून ओढत होते. मंत्री मकरंदआबा पाटील माझ्या मदतीला आले. त्यांनाही पोलिस धरत होते. म्हणजे राज्याचा मंत्र्यांशी पोलिस असे वागत असतील तर...माझ्या हाताला लागलं, रक्त आलं. म्हणून रूमाल बांधला. नंतर पट्टी केली. साताऱ्याचे पोलिस हे भाजपच्या घरगड्यासारखे वागले आहेत. अतिशय निंदनीय कृत्य सातारा पोलिसांनी केले आहे. त्याचे तीव्र पडसाद सातारा जिल्ह्यात उमटतील, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
आम्ही महायुतीमध्ये मंत्री असूनही भाजपने आमच्या विरोधात पोलिस बळाचा वापर केला. भाजपवाले आज ढोल ताशे वाजवत असतील मात्र नैतिक विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचाच आहे. आमचे ३७ सदस्य होते. आमचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य घेऊन गेले, त्यांच्यावर अपात्रेतची कारवाई करणार आहोत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
देसाई म्हणाले,साताऱ्यातील जनमताचा अपमान भाजपने पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने केलेला आहे. त्यांना क्षणिक आनंद मिळेल, यापुढच्या काळात मोठ्या निवडणुका येणार आहेत, त्या निवडणुकीत आम्ही भूमिका घेऊ. सातारा जिल्हा परिषदेत घडलेला संपूर्ण प्रकार आम्ही कॅबिनेट बैठकीत मांडणार आहोत. मंत्र्यांना पोलिस धक्काबुक्की करत असतील, ओढत असतील, त्या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि या घटनेचे पडसाद तीव्रपणे जिल्ह्यात उमटतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.