Satara News : महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत सातारा जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले असून महिला व मुलींची सातत्याने छेडछाड करताना सलग तिसऱ्यांदा सापडल्यास पोलिसांनी संबंधिताची शहरातून धिंड काढावी, अशी सक्त सूचना सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कडक उपाय योजना केल्या जात असून सर्व बस, रिक्षा, वडापमध्ये क्युआर कोड लावला जाणार असून प्रवासादरम्यान कोणी छेडछाड केल्यास क्युआर कोड स्कॅन केल्यास पोलिसांना अलर्ट जाईल आणि संंबंधितांवर तातडीने कारवाई होईल, असेही शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.
बदलापूर आणि कोलकत्ताच्या घटनेनंतर सातारा जिल्ह्यातही महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा प्रशासनाने कडक उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी पत्रकारांना दिली.
जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळा, महाविद्यालयातील मुलींसाठीच्या स्वच्छता गृहात जाण्याच्या एंट्री पॉइंटमध्ये बदल केला जाणार असून येथील स्वछतागृहाची सफाई महिला कर्मचाऱ्यांकडून करावी, अशी सक्त सूचना दिली आहे. तसेच या कामासाठी रोजंदारीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे. अन्यथा संबंधितांला कामावर ठेवता येणार नाही, असेही देसाई यांनी सांगितले.
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने सर्व माध्यमिक विद्यालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीची पोलिस व शिक्षण विभागाकडून सोमवारपासून बैठका होणार आहेत. यामध्ये काही पालकांना आपल्या मुलीबद्दल काही शंका किंवा प्रश्न असेल तर महिला पोलिसांना त्या कळविल्या जाणार आहेत. त्यामुळे तातडीने त्याच दिवशीच संबंधितांवर कठोर कारवाई करता येईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
महिला सुरक्षिततेसाठी बस, रिक्षामध्ये क्युआर कोड लावणार
प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षिततेसाठी बस, रिक्षा, वडापमध्ये क्युआर कोड लावण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान कोणी महिलांची छेडछाड केल्यास संबंधित महिलेने हा क्युआर कोड स्कॅन केल्यास तातडीने पोलिसांना ॲलर्ट मिळेल व ते तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करतील, असेही देसाई म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.