सातारा : हजारोंच्या मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून येणार नाही, असे सांगणाऱ्या मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्तेपद सोडून कुंडलीवरून भविष्य बघायचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे का, असा प्रश्न करून राष्ट्रवादीने कितीही ताकत लावली तरी येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत दूध का दूध और पानी का पानी होईल, असे प्रतिउत्तर राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी श्री. शेख यांना दिले आहे.
राष्ट्रवादीला आणखी दहा ते १५ वर्षे सत्तेसाठी तळमळत बसावे लागेल, या मंत्री देसाईंच्या टीकेवर दत्तानाना भरणे व राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी मंत्री देसाईंवर टीका करताना ते पाटण मतदारसंघातून आगामी निवडणुकीत निवडून येणार नसल्याची भाकित केलं होतं. त्याला मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे.
मंत्री देसाई म्हणाले, दत्तानाना भरणे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असे म्हणाले आहेत. कोणालाही आपला पक्ष वाढवायचा असतो. त्यानुसार प्रत्येक नेते आपल्या पक्षाला राज्यात एक नंबर आणायचा प्रयत्न करतो. दत्ता नानांनी संसदीय आयुधांचा योग्य वापर करून बोलले आहेत. पण, मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते पद सोडून भविष्य व कुंडली बघायचा व्यवसाय सुरू केलायं काय का.
भाजपच्या प्रदेश सरचिटणीस चित्रा वाघ यांनी शेख यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर पाच,सहा महिने त्यांचे दर्शन झालं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बोलताय तर मला त्यांना सांगायचे आहे की, २००४, २०१४, २०१९ अशा तीनही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा हजारोंच्या मताने आम्ही पराभव केला आहे. त्यांच्यापेक्षा जास्त ग्रामपंचायती आम्ही निवडून आणल्या आहेत. सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटणकर गट व राष्ट्रवादीला आम्ही धुळ चारली आहे.
जी ताकत लावायची ती लावा मतदारसंघात येऊन भविष्य सांगण्यापेक्षा त्यांच्यावर बोलण्या ऐवढे ते मोठे नाहीत पण, त्यांनी मतदारसंघ निवडावा व निवडून येऊन दाखवावे. त्यांच्याकडे मतदारसंघ नाही, कधी निवडून आलेले नाही. त्यांनी भविष्य सांगणे, कुंडली बघून भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. हजारोंच्या मताने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींविषयी भाष्य करणाऱ्यांना येत्या निवडणूकीत दूध का दूध पानी का पानी पहायला मिळेल. २०२४ च्या निवडणुकीत त्यांना आम्ही दाखवून देऊ, असे प्रतिउत्तर श्री. देसाईंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.