

Karad, 06 November : राजकारणात नाती अनेकदा सत्तासमीकरणांना नवी दिशा देतात. सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणात आता अशाच एका नात्याची चर्चा रंगू लागली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सख्खे साडू आता एकाचवेळी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे, हे दोघेही सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात ऐतिहासिक प्रभाव असलेल्या देसाई आणि उंडाळकर घराण्यांचे वारसदार आहेत. त्यामुळे दोन राजकीय घराण्यांचा वारसा आणि कौटुंबिक नातेसंबंध यांचा संगम जिल्हा बँकेच्या सत्ताकेंद्रात होणार आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला देसाई आणि उंडाळकर घराण्यांचा मोठा वारसा आहे. बँकेचे पहिले अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब देसाई होते. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र (स्व.) शिवाजीराव देसाई यांनी संचालक म्हणून काम पाहिले.
माजी सहकारमंत्री (स्व) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी प्रदीर्घ काळ बँकेच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला होता. अनेक वर्षे बँकेची सूत्रे सांभाळताना त्यांनी सहकार क्षेत्रात स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केले होते. या दोन्ही नेत्यांच्या कार्यकाळामुळे देसाई आणि उंडाळकर घराण्यांची जिल्हा बँकेवरील पकड अधोरेखित झाली होती.
आता तब्बल ५४ वर्षांनंतर देसाई घराण्याचे प्रतिनिधित्व शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून पुन्हा बँकेच्या संचालक मंडळात पोचत आहे. पाच वर्षांच्या ब्रेकनंतर ॲड. उंडाळकर यांचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रवेशांना केवळ संचालकपदापुरते मर्यादित महत्त्व नसून त्यामागे राजकीय वारसा आणि सहकारातील प्रभावाचेही संदर्भ आहेत.
मंत्री देसाई यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाची जबाबदारी आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव आहे. आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांचा सहकार क्षेत्रातील सहभागही वाढणार आहे. दुसरीकडे, ॲड. उंडाळकर यांनी रयत कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. वडिलांनी निर्माण केलेला सहकारातील राजकीय वारसा पुढे नेण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
विशेष म्हणजे, सख्खे साडू असलेले हे दोन्ही नेते एकाचवेळी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात असणार आहेत. कौटुंबीक नात्याबरोबरच दोन प्रभावी राजकीय घराण्यांचे प्रतिनिधित्वही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आगामी काळात बँकेच्या राजकारणात या दोघांची भूमिका, परस्पर समन्वय आणि जिल्ह्यातील सहकाराच्या नव्या सत्तासमीकरणांतील त्यांचा प्रभाव कसा राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नात्याची वीण प्रभावी ठरणार
सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात सख्खे साडू एकत्र येणे ही केवळ कौटुंबीक योगायोगाची बाब नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रातील घडामोड आहे. शंभूराज देसाई यांच्याकडे राज्यातील सत्तेचा अनुभव, तर उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याकडे सहकार क्षेत्रातील नेतृत्वाची जबाबदारी आहे. कौटुंबीक नात्याची ही वीण बँकेच्या राजकारणात किती प्रभावी ठरणार आणि दोघांचा समन्वय कसा राहणार, याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.