

Satara, 05 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने उजवी कामगिरी केली आहे. सोसायटी मतदारसंघातील 11 जागा वगळता इतर दहा जागांपैकी पाच जागा घेणाऱ्या भाजपला प्रत्यक्ष निवडणुकीत केवळ नऊ जागांवर यश मिळविता आले आहे. निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांवर दगाफटका, विश्वासघाताचा आरोप केला आहे. मात्र, भाजपशी दगाफटका कोणी केला, अशी चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर आपल्या पक्षाचा अध्यक्ष निर्विवादपणे बसवायचा होता. त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निरोप, रिझर्व्ह बॅंकेचा नियम यामुळे भाजपच्या मातब्बरांना निवडणुकीतून बाहेर बसावे लागले.
बिनविरोध झालेल्या नऊ जागांपैकी तब्बल ५ जागा भाजपच्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३, तर शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली होती. उर्वरीत १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वााधिक ५, भाजपने ४, तर शिवसेनेने ३ जागा जिंकल्या. अधिक जागा लढवूनही भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यामुळे भाजपला आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून बॅंकेचा अध्यक्ष करताच येणार नाही.
विशेष म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मिळविलेल्या यशामुळे बॅंकेच्या अध्यक्षपदाची चावी ही पालकमंत्री देसाई यांच्याच हातात आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कटू अनुभवामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी सावध झाली आहे. त्यामुळे भाजपला या दोन्ही पक्षांचे सदस्य फोडणे आता तेवढे सोपे राहिलेले नाही, त्यामुळे अध्यक्षपदाची लॉटरी कोणाला लागणार, याची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्राला आहे.
निकालानंतर जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या हल्लाबोलमुळे राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना नेत्यांच्या नाराजीत आणखी भर पडू शकते. पण गोरेंचा रोख नेमका कोणाकडे आहे. महायुतीचा धर्म नेमका कोणी पाळला नाही, शिवसेना की राष्ट्रवादी असा सवाल सध्या चर्चिला जात आहे.
मोठा भाऊ भाजपच; पण सत्तेची चावी शिवसेना-राष्ट्रवादीकडे
सातारा जिल्हा बॅंकेत आता भारतीय जनता पक्षाचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे ४ असे सदस्य आहेत. संख्याबळाचा विचार करता जिल्हा बॅंकेत मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष ठरला आहे. मात्र, बॅंकेच्या सत्तेची चावी ही शिवसेना-राष्ट्रवादीच्या हाती आहे. पण, जिल्हा परिषदेप्रमाणे भाजप गेम फिरविणार का, याची धास्ती सध्या सर्वांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.