
Pandharpur News : लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकत महाविकास आघाडीनं महायुतीला जोर झटका दिला होता. मात्र,लोकसभेतील यशानंतर हवेत गेलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत विरोधीपक्षनेतेपदही खेचून आणता आले नाही. त्यांना अवघ्या 49 जागाच मिळाल्या. यानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर गंभीर आरोप केले. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी त्यांनी ईव्हीएमविरोधात रान पेटवलं आहे. त्यांच्या मारकडवाडी ग्रामपंचायतीच्या लढ्याची दखल राज्यभरातच नाहीतर देशाच्या संसदेतही घेतली गेली. शरद पवारांनीही या लढ्याला पूर्ण ताकद दिली. याच उत्तमराव जानकरांनी आता महायुती सरकारबाबत (Mahayuti Government) धक्कादायक दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी गुरुवारी (ता.2) पंढरपुरात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईव्हीएमविरोधातील लढाईचा पुनरुच्चार तर केलाच शिवाय पुढील 3 महिन्यांत राज्यातलं महायुती सरकार कोसळणार असल्याचं खळबळजनक दावाही केला आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर ईव्हीएमविरोधात एकही शब्द काढण्यात आला होता. मात्र,विधानसभा निवडणुकीत घोळ झाला असल्याचा आरोप करत महाविकास आघा़डीच्या नेतेमंडळींकडून केला जात आहे. महायुतीच्या नेत्यांनीही आघाडीच्या या आरोपांना जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. पण तरीही आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमविरोधातला लढा सुरूच ठेवला आहे.
अशातच आता शरद पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर यांनी तीन महिन्यांत राज्यातलं सरकार पडणार आहे असा दावा केला आहे. तसेच यासंबंधीचे पुरावे आपण सादर केल्यावर सगळा देश गडबडून जाईल. सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्यावा लागणार’ असं धक्कादायक विधान आमदार जानकर यांनी केलं आहे.
यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना ओपन चॅलेंज देत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नसेल तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा असंही म्हटलं आहे. जर बॅलेटपेपरवर निवडणुका घेतल्या तर अजित पवारांचा 10 हजार मतांनी पराभव होईल, असंही त्यांनी दावा केला आहे. देशासह राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इरादाही जानकर यांनी बोलून दाखवला आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि महायुती सरकारबाबत त्यांनी गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले,वाल्मिक कराड आणि महायुती सरकारमध्ये तडजोडी झाल्या आहेत,त्यामुळेच तीन आरोपी अजूनही फरार आहेत.
पोलिसांनी आरोपी वाल्मिक कराड याला अटक करणं अपेक्षित होतं,पण तोच हजर झाला, ही मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. 'आका'च्या मागे कोण आहे? हे गृहखात्यानं शोधून काढावं,जर त्यांना सापडत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्यावं,आपण सगळं शोधून काढू असंही यावेळी जानकर यांनी सांगत राज्य सरकावर टीकेची तोफ डागली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.