

Solapur News: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सोलापूरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव पांढरे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा धक्का मानला जात असून, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राजकीय ताकदीवरही या घडामोडीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बापूराव पांढरे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात या पक्षप्रवेशाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पांढरे यांच्या भाजप प्रवेशामुळे माजी आमदार राम सातपुते यांची स्थानिक राजकारणातील ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
आता बापूराव पांढरे यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूरमधील राजकीय समीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाचा स्थानिक राजकारणावर नेमका किती परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या भूमिका आणि पक्षीय हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार महायुतीच्या नेत्यांसोबत प्रचारात दिसत असल्याने पक्षांतर्गत नाराजीही समोर आली आहे.
करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला असून, ते महायुतीच्या मेळाव्यातही सहभागी झाले होते. दुसरीकडे, मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार उत्तमराव जानकर आणि शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हेदेखील गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांसोबत दिसत आहेत.
पक्षातील आमदारांच्या भूमिकेवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी निवडून दिल्यानंतर आमदारांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसोबत जाणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
भरसभेत बोलताना मोहिते पाटील यांनी आपल्या पक्षातील आमदारांचे कान टोचले होते. मतदारांनी शरद पवारांकडे पाहून मतदान केले आहे, त्यामुळे दुसऱ्यांच्या दारात जाऊन लाचारी पत्करू नका, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.