
महेश सारंग यांनी शिंदे सेनेला आठ दिवसांत भाजप फोडण्याचे आव्हान दिले होते.
संजू परब यांनी अवघ्या ४८ तासांत प्रत्युत्तर देत भाजपच्या चार ग्रामपंचायत सदस्यांचा पाठिंबा जाहीर केला.
यामुळे सावंतवाडीत महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
Sindhudurg News : सध्या कोकणात महायुतीला तडा जाण्याची शक्यता असून याला कारणीभूत भाजप आणि शिवसेनेतील वाद ठरत आहे. गेल्या काही दिवसापासून स्थानिकच्या पार्श्वभूमिवर पक्ष मजबूत करताना महायुतीतीलच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होताना दिसत आहे. यामुळेच येथे महायुतीत मिठाचा खडा पडला असून दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकमेकाला आव्हान देताना दिसत आहेत. दरम्यान भाजपने शिवसेनेला दिलेले आव्हान आता चांगलेच अंगलट आले आहे. जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या बालेकिल्लातच फोडाफोडी केली आहे. यामुळे येथील वातावरण सध्या तापले आहे.
भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांना आठ दिवसांत भाजप फोडण्याचे आव्हान दिले होते. याला परब यांनी केवळ 48 तासांतच प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सारंग यांच्याच बालेकिल्ल्यातील भाजपच्या विद्यमान चार ग्रामपंचायत सदस्यांना फोडत थेट पत्रकार परिषदच घेतली. तसेच या चारही विद्यमान सदस्यांनी आपण स्वत: परब यांच्या नेतृत्वात शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात इच्छुक असल्याचे देखील सांगितलेय. यामुळे सावंतवाडी मतदारसंघात आता महायुतीमध्येच द्वंद होण्याची शक्यता असून राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे.
परब यांनी सारंग यांच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सारंग यांनी आधी आपलं गाव सांभाळावे. जो आपला गाव सांभाळू शकत नाही, तो मतदारसंघ आणि तालुका तरी काय सांभाळणार? अशी कोपरखळी मारत टीका केली. कोलगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोलगाव ग्रामपंचायतचे सदस्य रोहित नाईक, आशिका सावंत, प्रणाली टीळवे, संयोगिता उगवेकर हे उपस्थित होते.
यावेळी परब म्हणाले, ‘माझे मित्र सारंग यांनी मला भाजप फोडण्याचे आव्हान दिले, माझ्यावर टीकाही केली. त्यांच्या या टीकेला मी उत्तर देणार नव्हतो. मात्र, पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन सारंग यांच्या टीकेला उत्तर दिले. माझे नेते दीपक केसरकर यांच्या शब्दाला मान देऊन आज गप्प आहे; अन्यथा माझ्याकडे आज तालुक्यातील भाजपचे 116 ग्रामपंचायत सदस्य शिंदे शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मात्र, कोणी आव्हान दिल्यास गप्प बसणार नाही. मला यासंदर्भात कुठल्याही नेत्याने फोन करण्याचा प्रयत्नही करू नये. केवळ केसरकर यांच्या शब्दाला लागून आणि महायुतीचा धर्म पाळून गप्प आहे, नाहीतर आजच या चारही ग्रामपंचायत सदस्यांचा प्रवेश करून घेतला असता. सारंग यांनी हे लक्षात घ्यावे, उगाच माझ्या नादी लागू नये.’
दरम्यान ज्या पक्षाने संजू परब यांना उमेदवारी देऊन नगराध्यक्ष बनवले, त्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर बोलताना त्यांनी आधी आपली मर्यादा आणि आपण किती सक्षम आहोत हे ओळखावे. या ठिकाणी भाजप आता स्वबळावरच लढणार असून कोणाची किती ताकद आहे, हे तेव्हा दिसेलच. संजू परब यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आठ दिवसांत पक्षप्रवेश घेऊन भाजप फोडण्याचे आव्हान पूर्ण करून दाखवावे, असे आव्हान भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी शुक्रवारी (ता.1) दिले होते.
तर त्याआधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मंगळवारी (ता.29) पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यावरही टीका केली होती. सारंग यांनी प्रत्युत्तर देताना परब यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आठ दिवसांत पक्षप्रवेश घेऊन दाखवावेत असे आव्हान दिले होते. यानंतर परब यांनी 48 तास होण्याच्या आधीच भाजपचे चार ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत हजर केले. यामुळे आता जिल्ह्यात शिवसेना-भाजप वाद वाढण्याची शक्यता आहे.
1. महेश सारंग यांनी नेमके काय आव्हान दिले होते?
त्यांनी शिंदे सेनेला आठ दिवसांत भाजप फोडून दाखवावे असे खुले आव्हान दिले होते.
2. संजू परब यांनी काय प्रत्युत्तर दिले?
तेव्हाच संजू परब यांनी ४८ तासांत भाजपचे चार ग्रामपंचायत सदस्य शिंदे सेनेत आणले.
3. यामुळे महायुतीवर काय परिणाम होणार?
महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढू शकतो आणि सावंतवाडीत राजकीय समीकरणे बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.