

Solapur, 23 January (आप्पासाहेब हत्ताळे ) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मात्र अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या कासेगाव गटातील कासेगाव गणातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराने आज (ता. 23 जानेवारी) निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेकडून भाजपकडून ‘लक्ष्मीदर्शन’चा आरोप केला जात आहे, त्यामुळे आगामी काळात सोलापूरचा निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत.
दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील वळसंग, कुंभारी, बोरामणी हे तीन जिल्हा परिषद गट अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत. सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोटचे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या तीन जिल्हा परिषद गट, गणांसह संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात भाजप आणि शिवसेनेत निकारीची लढाई सुरू आहे.
महायुतीमध्ये हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेवर असताना स्थानिक पातळीवर मात्र भाजप आणि शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक नेत्यांमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे आमदार कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडून चुरशीने या निवडणुका लढवल्या जात आहेत. त्यातूनच एकमेकांना शह-कटशह देण्याचे काम सुरू आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव गणातून शिवसेनेकडून शंकर वाडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरला होता. मात्र, आज सकाळी त्यांनी अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे या खेळीतून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.
नगरपालिका, महापालिका निवडणुकीनंतर भाजप आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही लक्ष्मीदर्शनासह सर्व नीतींचा वापर करत आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केला आहे, त्यामुळे दोन्ही पक्षातील शह-कटशहाच्या राजकारणाला उधाण येण्याची चिन्हे आहेत.
खुल्या कासेगाव गणातून भाजपमधून अनेकजण इच्छुक होते. मात्र, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ऐनवेळी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य (कै.) उमाकांत राठोड यांचे पुत्र विजय राठोड यांना उमेदवारी दिली आहे. बोरामणी गटातील शिवसेनेचे उमेदवार धनेश आचलारे यांच्या शिफारशीवरून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी कासेगाव गणातून शंकर वाडकर यांना उमेदवारी दिली होती.
शंकर वाडकर यांनी आज स्वतःहून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाडकर यांच्या माघारीमुळे कल्याणशेट्टी यांनी शिवसेनेला धक्का दिल्याचे मानले जात आहे. या खेळीचा उमेदवार आचलारे यांनाही फटका बसू शकतो, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे, त्यामुळे शिवसेना या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याच्या तयारीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.