

Solapur, 20 April (प्रमिला चोरगी) : सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा योजना आणि करवाढीवरून जोरदार धुमश्चक्री झाली. तब्बल चार तास झालेल्या सभेत करवाढीबाबत प्रश्न विचारणारे शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. शिंदे आणि नरोटे हे आम्हाला निलंबित कोणत्या मुद्याच्या आधारावर केले, असे विचारत होते. मात्र, त्यांना शेवटपर्यंत निलंबनाचे कारण देण्यात आले. शेवटी गोंधळताच सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सर्व १२ विषय मंजूर झाल्याचे जाहीर केले.
सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत १३७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह १२ विषय अजेंड्यावर होते. गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरवात करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी करवाढीच्या मुद्यावरून भाजपचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कोणतीही करवाढ करणार नसल्याचे सांगितले असताना करवाढ छुप्या पद्धतीने कशी काय करता, असा सवाल केला होता, त्यामुळे महापालिकेच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महापालिकेच्या सभेला सुरवात होताच १३७८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत कोणती कामे येणार आहेत. प्रकल्प कधी पूर्ण होणार? पाणी दररोज ठराविक वेळ येणार की २४ तास मिळणार? या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चार तास खडाजंगी झाली.
पाणी योजनेसाठी महापालिका स्वहिश्याचा ३४४ कोटींचा निधी कसा उभारणार? करवाढ करणार नाही मग पर्यायी मार्ग कोणते, याची माहिती नगरसेवकांनी विचारली. करवाढीतून निधी उभारणार नाही, तर भांडवली करवाढ प्रणाली सुधारणार, असे सभागृह नेत्यांनी सांगितले.
ही सुधारित करवाढ प्रणाली कशी असणार? याबाबतची सविस्तर माहिती महापौरांनी सांगावी, अशी मागणी शिवसनेचे अमोल शिंदे, कॉंग्रेसचे चेतन नरोटे यांनी केली. ही मागणी जोर धरत असतानाच महापौरांनी या दोन्ही नगरसेवकांच्या निलंबनाचे आदेश नगरसचिवांना दिले. त्यानंतरच्या विरोधकांच्या गोंधळातच महापौर विनायक कोंड्याल यांनी विषय पत्रिकांवरील १२ विषयांना एकमताने मंजुरी दिली.
शिंदे-नरोटे यांच्या प्रश्नावर नगरसचिव निरुत्तर
सुधारीत करवाढ प्रणालीबाबत सभागृहाला माहिती द्यावी, यासाठी नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी सभागृहात गोंधळ घातला. या गोंधळामुळे दोन्ही नगरसेवकांचे आजच्या सभेसाठी निलंबन करण्यात येत आहे, त्यांनी सभागृहाबाहेर जावे, असे महापौरांनी आदेश दिले. पण, आम्ही कोणत्या नियमांचा भंग केला आहे? आम्ही का बाहेर जावे? असे उलट सवाल या दोघांनी नगरसचिवांना केले. यावर नगरसचिव मात्र निरुत्तर झाले.
सत्ताधारी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले
आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. जनतेची बाजू आम्ही सभागृहात मांडणार. आम्हाला योजनेची नीट माहिती द्या. सुधारित करवाढ काय असणार याचीही माहिती द्या, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांची होती. तर नगरसेवक किसन जाधव, श्रीदेवी फुलारे, अर्चना वडनाल, रोहिणी तडवळकर, संजय कोळी, श्रीकांचना यन्नम, रंजिता चाकोते यांनी प्रश्नांची सरबत्ती करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.