Koregaon Politic's : एकनाथ शिंदे स्टेजवर पोचण्यापूर्वीच शिवसेना आमदाराच्या भाजप प्रवेशाची स्ट्रॅटेजी ठरली

Mahesh Shinde News : साताऱ्यात शिवसेनेतील वाद उफाळला असून महेश शिंदे यांनी शंभूराज देसाईंवर टीका केली. जयकुमार गोरे यांच्या पाठिंब्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे.
Eknath Shinde-Mahesh Shinde-Shambhuraj Shinde
Eknath Shinde-Mahesh Shinde-Shambhuraj ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara, 20 April : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीपासून शिवसेनेत सुरू असलेल्या धुसफुशीचा सोमवारी अखेर स्फोट झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील सभेचे निमंत्रण दिले नसल्याचे सांगत आमदार महेश शिंदे यांनी आपल्याच पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर अवघ्या काही तसांतच भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी महेश शिंदे जो निर्णय घेतील, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे जाहीरपणे सांगितले, त्यामुळे एकनाथ शिंदे साताऱ्यातील सभेला जाण्यापूर्वीच शिवसेना आमदाराची भाजप प्रवेशाची तयारी झाल्याचे मानले जात आहे.

शिवसेना आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या पत्नीला भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यातून शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांसह भाजपसोबत जात सातारा झेडपीतील सत्तेपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला दूर ठेवले, त्याची खंत पालकमंत्री या नात्याने शंभूराज देसाई यांना होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांनी घेतलेली भूमिका शंभूराज यांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर आमदार शिंदे आणि पालकमंत्री देसाई यांच्यात अंतर पडत गेले. शंभूराज देसाई यांनी कोरेगावात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना शिवसेनेत (Shivsena) प्रवेश देऊन आमदार शिंदे यांना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडी आणि सातारच्या मेळाव्याचे निमंत्रण नसल्याने संतापलेल्या महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केला. देसाई मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देत आले आहेत, कोणत्याही कार्यक्रमांना ते बोलवत नाहीत. सातारा दौऱ्यासाठी आणि कार्यक्रमासाठी मला बोलावलं नाही.

Eknath Shinde-Mahesh Shinde-Shambhuraj Shinde
ZP Nominated Member : झेडपी ‘स्वीकृत’ इच्छुकांनो कामाला लागा, ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा : 'येत्या 8-10 दिवसांत जीआर निघणार’

देवेंद्र फडणवीस यांनी मला २०१९ मध्ये शिवसेनेकडून लढायला सांगितले, त्यामुळे मी शिवसेनेकडून लढलो. आम्ही पहिल्यापासून भाजपसोबत काम करत आलो आहोत, असेही सांगायलाही महेश शिंदे विसरले नाहीत. त्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी महेश शिंदे हे जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगितले. या सर्व घडामोडी एवढ्या वेगाने घडत आहेत, की सर्व काही नियोजित आहे की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

आमदार महेश शिंदे हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले असले तरी ते भाजपशी संबंध ठेवून होते. कोरेगावमध्ये शिवसेना आणि भाजप एकाच घरातून चालत होती. शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे दोन्ही पक्ष एकाच घरात नांदत होते, हे उघड सत्य आहे. त्यात सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची भर पडली.

Eknath Shinde-Mahesh Shinde-Shambhuraj Shinde
Mahesh Shinde : भाजपच्या बड्या नेत्याचा शिवसेना आमदाराला शब्द : महेश शिंदे जी भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू...

महेश शिंदेंच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या शंभूराज देसाई यांनी कोरेगावात पर्याय उभा करण्याचा प्रयत्न चालवला. तसेच खुद्द पक्षाच्या प्रमुख नेत्याचा दौरा असतानाही विश्वासात न घेतल्याने शिंदे यांनी मागचं पुढचं सर्व काढून पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेतून ‘मातीमोल’चा आठवून करून देत शिंदेंना डिवचले. त्याचवेळी सोलापुरात बोलताना जयकुमार गोरे यांनी महेश शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे एकनाथ शिंदे स्टेजवर पोचण्यापूर्वीच महेश शिंदेंच्या भाजप प्रवेशाची संहिता लिहिली गेल्याचे स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com