राम काळगे
Latur Politics News : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख या राजकारणातील दोन मित्रांचे स्मारक लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात शेजारीशेजारी उभारण्यात आले. विलासराव देशमुख यांचे स्मारक यापुर्वीच झाले, त्यानंतर काल गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित अनावरण झाले. त्यानंतर लातूर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासात ज्यांचे योगदान आहे अशा माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पुतळा कधी उभारणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पुर्णाकृती पुतळा उभारणीसाठी सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव पारीत होऊनही पूर्णाकृती पुतळा उभारणीला विलंब होत असल्याबद्दल त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. (Congress) गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर प्रामुख्याने डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन कधी होणार? अशी विचारणा केली जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदीर्घकाळ नेतृत्व केले आहे. (Latur) मुख्यमंत्री असताना नियमित लक्षात राहील अशी त्यांची कामगिरी म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या विभागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न. सर्वप्रथम निलंगेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. महाराष्ट्रात विकासाचा असमतोल निर्माण झाला होता, तो कसा दूर करता येईल, यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली.
मागासलेल्या भागांना अधिक न्याय देण्याचा संकल्प त्यांनी केला व त्यातून मराठवाड्यासाठी 42 कलमी, विदर्भासाठी 33 कलमी आणि कोकणासाठी 40 कलमी विकासाचा कार्यक्रम घोषित केला. विकासकामांचा सपाटाच मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्याबरोबर सुरू केला होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिली ते बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, स्वातंत्र्यसैनिकांच्या मानधनामध्ये वाढ, तालुका पातळीपर्यंत एमआयडीसी स्थापन करण्याची योजना, खेडोपाडी दूरदर्शन संचांचे वाटप, पर्यावरण विभागाची निर्मिती, पीक विमा योजना अशी ही मोठी यादी आहे.
खंडपीठाला मंजूरी..
औरंगाबाद खंडपीठाची मंजुरी व बांधकाम, मुंबईत काँग्रेसच्या शताब्दी सोहळ्याचे यशस्वी आयोजन, अशी अनेकोत्तम कामे त्यांच्या काळात झाली. डॉ. निलंगेकर यांच्या कामाचा वेग बघून विरोधकांचे धाबे दणाणले होते हा माणूस अधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहिला तर आपले या पदावर जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे विरोधकांना व विशेष म्हणजे पक्षांतर्गत नेत्यांनाही वाटत होते. लातूर जिल्हा परिषदेमध्ये अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिली होती.
ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख व त्यांच्या सल्ल्याने राजकीय समीकरणे जुळवली जायची. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा यापूर्वीच झाला असून गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत काल पार पडले. मात्र डॉ. निलंगेकर यांच्या पुतळ्याची भूमिपूजन झाले नाही, अशी खंत निलंगेकर समर्थकांमध्ये आहे.
लातूर जिल्हा परिषदेने यापूर्वीच माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचाही पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून ठराव घेतला असून राज्य शासनाच्या आवश्यक त्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पुतळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर आहे. मात्र कोणत्या कारणामुळे पूर्णाकृती पुतळ्याचे काम प्रलंबित आहे, हे काही स्पष्ट केले जात नाही.
जागा, परवानगी अन् निधीही..
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व जि. प. लातूरचे माजी अध्यक्ष अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही याबाबत खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कर्मयोगी दिवंगत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी जिल्हा परिषदेत ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. आवश्यक निधी राखीव ठेवला असून, जागा निश्चितीपासून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
तरीदेखील पुतळ्याचे भूमिपूजन अद्याप झालेले नाही. लातूर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये व महाराष्ट्राच्या जडणघडणीत निलंगेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय लातूरच्या विकासाचा पायाबरोबर त्यांनी शिक्षण, सिंचन, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात विकासाचे भरीव कार्य केले आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजनही लवकरात लवकर व्हावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.