
Kolhapur News : जिल्ह्यात कधीकाळी दोन खासदार आणि सहा आमदार असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लोकसभा आणि विदानसभेला सुपडा साफ झाला. आता औषधालाही जिल्ह्यात आमदार नसताना पदाधिकाऱ्यांमध्ये देखील पदावरून अंतर्गत वाद सुरू आहे. नुकताच कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर शहर प्रमुख पदी हर्षल सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच ही नियुक्ती कळीचा मुद्दा ठरली असून शिवसेनेत नाराजी नाट्यच सुरू झाले आहे. तर या नियुक्तीवरून शहरप्रमुख सुर्वे यांनी थेट नाराजी व्यक्त करत बंडाचा पवित्रा घेतला आहे. तसेच पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीबरोबर काम करणार नसल्याचीही भूमिका घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना जिल्ह्यात सपाटून मार खावा लागला होता. यानंतर तोंडावर आलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील रखडलेल्या नियुक्त्या मुंबईतून जाहीर झाल्या. पण आता याच नियुक्त्या ठाकरेंच्या अडचणी वाढणाऱ्या ठरत आहेत. इंगवले यांची जिल्हाप्रमुख पदी केलेल्या नियुक्तीवरून अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
गेले काही दिवसापासून जिल्हाप्रमुख बदलाच्या हालचाली सुरू होत्या. ज्यात जिल्हाप्रमख पदासाठी जोरदार रस्सीखेच पहायला मिळत होती. इंगवले यांच्यासह हर्षल सुर्वे व उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे यांनी जिल्हाध्यपदासाठी फिल्डिंग लावली होती. पण इंगवले यांना पक्षश्रेष्ठींनी संधी देत त्यांना जिल्हाप्रमुख केले. यामुळे आता इंगवले यांच्याकडे कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी असेल.
पण आता याच नियुक्तीवर सुर्वे यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. त्यांनी पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला जिल्हाप्रमुख करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाखालीकाम करणार नसल्याचा इशारा सुर्वे यांनी दिला आहे. सुर्वे यांनी, इंगवले यांनी जवळच्या कार्यकर्त्याचा आणि सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांना ज्यांनी जवळ केले ते त्यांच्यावरच उलटल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यांनी राजेश क्षीरसागर, संजय पवार, सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्याना दगा दिला आहे. या नेत्यांसह इतरांनी त्यांना नकारलेल्या नेत्याला आमच्या उरावर पक्ष आता बसवत असेल तर वेगळा विचार करावा लागेल अशी नाराजी सुर्वे यांनी व्यक्त केलीय.
तसेच सुर्वे यांनी, शिवसेना वाड्यावस्त्यावर पोहोचवण्याच काम आम्ही केलं. त्या पद्धतीने जिल्हाप्रमुख पदासाठी आपलं नाव निश्चित झालं होतं. तसं वरिष्ठांकडून निरोपही होता. मात्र अस काय झाल की एका रात्रीत नाव बदलण्यात आल? असा सवाल सुर्वे यांनी वरिष्ठांना केला आहे. तर याबाबत वरिष्ठांबरोबर बोलणं झालं असून नाराजी दर्शवली आहे. आता उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असही त्यांनी म्हटलं आहे. तर इंगवले हे कोल्हापूरचा जिल्हाप्रमुख नसून एखाद्या टोळीचा प्रमुख असून पक्षाने आपला निर्णय बदलून निष्ठावंत शिवसैनिकाला संधी द्यावी अशीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान शिवसेनेतील नाराजी आणखी वाढत असून हर्षल सुर्वे यांच्यापाठोपाठ उपनेते संजय पवार देखील या नियुक्तीवरून नाराज असल्याची चर्चा आहे. ते देखील सोमवारी (ता.30) यावरून आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आता आगामी स्थानिकच्या आधी ज्या मशालीने उर्जा निर्माण करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यांच्या एका निर्णयाने कोल्हापुरात शिवसेना संपुष्ठात येण्याची शक्यता आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी देखील नाराजांची नाराजी दूर न करता त्यांनाच थेट सुनावल्याने हे प्रकरण अधिकच तापलं आहे. अशात उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात. हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.