
Solapur, 21 July : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरात येऊन काहींना महापालिकेचे तिकिट देतो, महामंडळावर घेतो, अशा घोषणा करत आहेत. आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला शहराची जबाबदारी दिली. पण, शहरातील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष कशा प्रकारे महापालिकेचे तिकिट देऊ शकतो, महामंडळ कशा प्रकारे देऊ शकतो, असे सवाल पक्षाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे नाव न घेता विचारले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे आज (ता. २१ जुलै) सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी सोलापूर शहर कार्यकारिणीचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात शहराध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. ते म्हणाले, जे मेहनत करतात, ते पदाधिकारी प्रचंड डिस्ट्रर्ब झाले आहेत. आम्ही सोलापुरात काम करतो. पण काही लोक प्रदेश पातळीवरून वरिष्ठ पदे आणत आहेत. आम्ही काम करतो, पण आम्हाला प्रमोशन मिळत नाही, अशी धारणा सोलापूर शहरात काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ येऊ शकते.
सोलापूर शहरातील (Solapur City) कुठल्याही व्यक्तीला प्रवेश द्यायचा असेल अथवा पद द्यायचे असेल तर किमान आम्हाला बोलावा. आम्ही शेजारी उभा राहतो. आपल्या सर्वांना पक्ष वाढवायचा आहे. नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. प्रदेश पातळीवर घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सोलापुरात आल्यानंतर त्यांना पक्षाच्या कार्यालयात बोलावून घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, पक्षासाठी योगदान देणे महत्वाचे आहे, आजच्या मेळाव्यालाही शहरातील पक्षाच्या विविध आघाड्यांनीच प्रयत्न केले आहेत. तुमच्या कार्यक्रमालाही त्यांनी कार्यकर्ते आणलेले नाहीत, फक्त एकटे येतात. सोलापूर शहरात पदाधिकारी, फ्रंटलचे पदाधिकारी काम करतात. पण ज्यांना आपण प्रदेशावर घेता, त्यांना निधी देता, ते पक्षासाठी शहरात कोणतेही योगदान देत नाहीत, याची आम्हाला खंत आहे.
जिल्हाध्यक्ष (उमेश पाटील यांचे नाव न घेता) सोलापूर शहरात येऊन कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करत आहेत. मुंबईला घेऊन जात आहेत, तुम्हाला पद द्यायला लावतो, असे सांगून शहराच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या कामात विस्कळितपणा आणला जात आहे. आमचं चुकत असेल तर आम्ही माफी मागतो, आम्ही गेल्या १७ वर्षांपासून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आपण माझी सोलापूर शहराचे कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड केली होती, त्यामुळे आमचं चुकत असेल तर आमचे कान धरा, असेही संतोष पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, बाहेरचे लोक येऊन शहरातील कार्यकारिणी डिस्टर्ब करत आहेत. आमची शिस्त बिघडवत आहेत. ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केले, हकालपट्टी केली, अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन पदं देत आहेत. आम्हाला खूप वाईट वाटतं, जेव्हा आम्हीच हकालपट्टी केलेले लोक पक्षात येऊन मिरवत असतात. अशा वेळी आम्ही शहरातील पदाधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे पाहतो. या माझ्या एकट्याच्या भावना नसून सर्व पदाधिकाऱ्यांच्या आहेत. आमच्या भावना तुम्ही समजून घ्याव्यात, अशी अपेक्षा करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.