

Solapur Drought Panchnama: सध्या राज्यातील दुष्काळी पिकांचे पंतनामे प्रशासनाकडून केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर खरीपाची पेरणी केली पण पावसामुळे पीक वाया गेल्याने ते काढून टाकले, असे बरेच शेतकरी सांगत आहेत. अशावेळी काढून टाकलेल्या पिकांचे अवशेष बांधावर, शेतात आढळत नसल्यास पंचनाम्यावेळी शेजारील दोन शेतकऱ्यांना विचारून त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या जात आहेत. जिल्ह्यातील सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा त्या पिकांखालील क्षेत्र जास्त येणार नाही. याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांसह राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सध्या सर्वच तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. यातून पुढील आठ महिन्यांत तालुक्यात चारा, पशुधन, पाणी टंचाईचा संभाव्य अंदाज घेतला जात आहे.
दुसरीकडे कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठ्यांची त्रिस्तरीय समिती पंचनामे करीत आहे. यावेळी पिकासोबत शेतकऱ्यांना उभे करून त्यांचे फोटो घेतले जात आहेत. यावेळी शेतकऱ्याचे आधारकार्ड व बॅंक पासबुक देखील घेतले जात आहे.
दरम्यान, दुष्काळाचा फटका द्राक्ष, केळीसह अन्य फळबागांना देखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तसेच उसाची वाढ खुंटली असून पाण्याअभावी उसानेही माना टाकल्या आहेत. त्यामुळे फळबागांसह इतर पिकांचेही पंचनामे केले जात आहेत. सध्या शेतकऱ्याच्या सर्वच बाधित क्षेत्राचे पंचनामे केले जात असून किती हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत द्यायची याचा अंतिम निर्णय राज्य शासन घेईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वतंत्र पंचनामे जुलै-ऑगस्टमध्ये
शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली होती मात्र, पावसाची वाट पाहून त्यांची पिके वाया गेली. त्यानंतर शेतकऱ्यांनी ती पिके काढून पुढील पिकासाठी क्षेत्र मोकळे केले. काही शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणीसाठी जमिनीची मशागत करून ठेवली, पण पाऊस न झाल्याने त्यांना काहीच पेरणी करता आली नाही. अशा दोन्ही क्षेत्राचे देखील पंचनामे केले जात आहेत. मोकळ्या क्षेत्राला २०१२-१३ मध्ये राज्य सरकारने हेक्टरी मदत दिली होती. यंदाही तसा निर्णय होईल म्हणून अशा मोकळ्या क्षेत्राचेही स्वतंत्र पंचनामे केले जात आहेत.
याबाबत बोलताना दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले की, पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड झाले आहे, आम्ही दररोज १८ ते २० गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी व पंचनामे करीत आहोत. फळबागा, ऊस या पिकांसह खरीप पिकांखालील बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. यात मोकळ्या जमिनीचाही समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.