

Solapur, 03 March : सोलापूर शहराजवळून वाहणाऱ्या आदिला नदीचे ‘नाला’ म्हणून सर्व्हेक्षण करण्यासंदर्भातची सूचना नवनिर्वाचित महापौर विनायक कोंड्याल यांनी पाच दिवसांपूर्वीच जलसंपदा विभागाला केली होती. मात्र, याबाबत अवघ्या पाच दिवसांतच त्यांच्यावर ‘यू टर्न’ घेण्याची वेळ आली असून ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला,’ असा दावा महापौर कोंड्याल यांनी केला आहे.
विनायक कोंड्याल (Vinayak Kondyal) म्हणाले, आदिला नदीसंदर्भात परवा जी बैठक झाली, त्यात जलसंपदा विभागाकडेही कोणती माहिती आणि कागदपत्रे नव्हती. आदिलास सुमारे १०० वर्षांनंतर यावर्षीच्या पावसाळ्यात नदीचे स्वरूप आले होते. त्या ठिकाणी नाला अस्तित्वात असता तर तेवढं पाणी ओसरलं गेलं नसतं, असं माझं म्हणणं होतं.
सोलापूर (Solapur) महापालिकेच्या वतीने यापूर्वीच तिथं किमान नाला झाला असता तर ते पाणी ओसरून एवढं रान खराब झालं नसतं, असं माझं म्हणणं होतं. त्यात कोणालाही वाचवण्याचा किंवा शह देण्याचा विषय नव्हता. सीना नदी जर आपल्या सोलापूर शहरातून पुढे वाहत जाणार असेल तर ती आपल्या सर्वांसाठी अतिशय चांगली बाब आहे, असेही महापौरांनी नमूद केले.
ते म्हणाले, आदिला नदीला (Adila River) नाला करा, असं मी म्हणालो, असा काहींचा गैरसमज झाला. मुळात त्या ठिकाणी नाला नव्हताच, तर बशीसारखी जमीन होती. नाला असता तर एवढं पाणी ओसरलं गेलं नसतं, असं मला बोलायचं होतं. पण, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. सोलापूर शहराजवळून नदी जात असेल तर आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट असणार आहे. त्यासंदर्भात चांगल्या उपाययोजना करण्यात येतील. त्यातून कोणालाही शह देण्याचा आमचा कोणताही विषय नव्हता आणि नाही.
महापौर कोंड्याल काय म्हणाले होते?
बाळे येथील आदिला नदीचा १९१२ च्या टीपी प्लॅनमध्ये नाला असा उल्लेख आहे. पण, जलसंपदा विभागाने ती नदी आहे, असं क्यॅल्युलेट केलं होतं. पण ती नदी नसून नाला आहे. अनेकांनी कर्ज काढून त्या परिसरात प्लॉट घेतले आहेत, काहींनी घरं बांधली आहेत. बाधित लोकांनाही आम्ही बैठकीला बोलावलं होते.
त्यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेड आणि ब्ल्यू लाईनमधील फरक सांगितला. पण, आम्ही त्यांना आदिला नदी न म्हणता पुण्याच्या धर्तीवर रेड आणि ब्ल्यू लाईन असा उल्लेख करण्याचं बंधन घातलं. कमीत कमी मीटरचं पात्र ठेवून रेड आणि ब्ल्यू लाईन करत त्याचं ड्राईंग करण्यात येईल. त्यानंतर आमच्याशी चर्चा करून तो अहवाल समीट करण्यात येईल, असं महापौर विनायक कोंड्याल यांनी त्या बैठकीनंतर म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.