Solapur News : सोलापूरला मंजुर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र अजित पवारांनी बारामतीला पळवल्याच्या आरोप करत भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याचा इशारा दिला होता. देशमुख यांच्या या इशाऱ्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हवाच काढून घेतली आहे. राजकारणात राजीनामा देतो वगैरे असे शब्द ठरलेले असतात, ते खरे मानायचे नसतात अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
यंदाचे वर्ष हे आतंराराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात श्री अन्न उत्कृष्टता प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान अजित पवारांनी सत्तेत सहभागी होताच, हे प्रशिक्षण केंद्र बारामतीला हलवण्यात आल्याचा एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला. त्यानंतर जागे झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील सजग नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला. यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी देखील अजित पवारांच्या या पळवापळवीचा निषेध करत मिलेट सेंटर बारामतीला नेण्यास विरोध केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मिलेट सेंटर प्रकरणात संतप्त भूमिका घेत सुभाष देशमुख यांनी प्रसंगी राजीनामा देण्याची वेळ आली तर मी तो देईन, परंतु मिलेट सेंटर सोलापूरच्या बाहेर जाऊ देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच अजित पवारांनी सर्व काही बारामतीला घेऊन जाण्याची प्रथा पाडली आहे का? असा सवाल करत निशाणा ही साधला होता. एकीकडे हे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात लवकरात लवकर सुरू व्हावे म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पाठपुरावा करत आहे, असे असतानाच हा प्रकल्प जर बारामती नेण्याचा घाट घातला जात असेल तर सोलापूरकरांसाठी हा अन्याय आहे. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प सोलापूरच्या बाहेर जाऊ देणार नाही. तसे झाले तर नैतिक जबाबदारी म्हणून आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला होता.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी मिलेट सेंटर प्रकरणात आमदार सुभाष देशमुख यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला असल्याबाबत पाटील यांना विचारणा केली. त्यावर राजीनामा देण्याचा इशारा वगैरे हे फक्त राजकारणात बोलण्यापुरते असतं, कोणी राजीनामा देतो म्हटलं तर ते राजकारणात ते खर धरायचे नसते, प्रत्यक्षात कोणी राजीनामा देत नसते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री पाटील यांनी दिली. तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक आमदारांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला, मात्र प्रत्यक्षात कोणीच राजीनामा दिला नसल्याचे उदाहरणही चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांच्या राजीनामा प्रकरणावर दिले. त्यामुळे देशमुख यांचा राजीनाम्याचा इशारा हा केवळ राजकीय फार्स होता.हे आता स्पष्ट झाले आहे.
या मिलेट सेंटर प्रकरणात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी सुभाष देशमुख यांनी हा प्रकल्प बारामतीला जात असेल तर नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी या श्री अन्न प्रकल्पाचे प्रशिक्षण केंद्र बारामतीला होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन देशमुखांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा, आम्ही त्यांचा जाहीर नागरी सत्कार करू अशी मागणी केली आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.