
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून पेटलेल्या राजकारणाची धग नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही अनुभवायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्या भाजपला शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यात धक्क्यावर धक्के दिले. परिणामी राज्यात 10 जागा निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोलापूर (Solapur) जिल्ह्यात तब्बल 4 जागा मिळाल्या. पण आता सोलापूरचं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात अनियमित कर्ज वाटपामुळे हे बँकेचं एवढ्या कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत.
राज्य सरकारच्या सहकार विभागाचे निवृत्त अप्पर निबंधक डॉ.किशोर तोष्णीवाल यांची प्राकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले.आता सहा वर्षांनंतर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर नुकसानीची जबाबदारी निश्चित कण्यात आहे. याप्रकरणी आता 32 संचालकांसह दोन अधिकारी आणि एक सनदी लेखापालावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळी या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. हा निकाल 8 नोव्हेंबरला म्हणजेच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत देण्यात आला होता. त्यामुळे या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. पण यामुळे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजप (BJP) आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या आणि याप्रकरणात दोषी असलेल्या 32 जणांकडून वसुलीचे आदेश देण्यात आले आहे. यात दिलीप माने,सुधाकर परिचारक, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्राप्पा पाटील, भाजप आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे,चंद्रकांत गणपतराव देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांविरोधात वसुलीचे आदेश काढण्यात आले आहेत .
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ 2018 मध्येच बरखास्त करण्यात आले होते. तेव्हापासून बँकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचा कारभार प्रशासकाचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बँकेच्या नुकसानीमागे अनियमित कर्जवाटप, ठप्प कर्ज वसुली यांसारखी अनेक कारणं असल्याचं चौकशीत समोर आली आहेत.
यात रणजितसिंह मोहिते पाटील - 55.54 लाख, दीपक साळुंखे 20.72 कोटी, राजन पाटील 3.34 कोटी, रश्मी बागल 43.26 लाख, अरुण कापसे 20.74 कोटी,रामदास हाक्के 8.41कोटी,सुधाकर रामचंद्र परिचारक 11.83 कोटी, सुनील सातपुते 8.41 कोटी,सिद्रामप्पा पाटील 16.99 कोटी,दिलीप माने 11.63 कोटी यांसारख्या अनेकांवर नुकसानीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. संचालक मयत असेल तरी त्यांच्या कायदेशीर वारसदारांकडे रकमेची वसुली करण्याची तरतूद आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.