
Pandharpur, 11 February : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल 55 माजी संचालक आणि 15 अधिकाऱ्यांना साखर विभागाच्या विशेष लेखा परीक्षकाने नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिशीच्या माध्यमातून ‘तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये,’ अशी विचारणा करण्यात आली आहे, त्यामुळे सोलापूरच्या साखर कारखानदारीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातून (Vitthal Sugar Factory) 2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षात सुमारे 10 कोटी 45 लाख 26 हजार रुपयांचे नियमबाह्य पद्धतीने ॲडव्हॉन्स स्वरूपात वाटप केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. ऊसतोडणी, वाहतूक ठेकेदार आणि काही शेतकऱ्यांना तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पैसे वाटप केले आणि कारखान्याचे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस 55 माजी संचालक आणि 15 अधिकाऱ्यांना दिली आहे.
श्री विठ्ठल सर्व सेवा संघाच्या माध्यमातून ॲडव्हाॅन्स स्वरुपात जवळपास 10 कोटी 45 लाख रुपयांचे नियमबाह्य वाटप करण्यात आल्याचे लेखा परीक्षण अहवालात (Audit report) दिसून आले आहे, असा उल्लेख नोटिशीमध्ये विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी केला आहे.
कारखाना पोटनियमात तरतूद नसताना आणि निबंधकांची मान्यता न घेता तत्कालीन संचालक मंडळाने ही रक्कम दिल्याचे लेखा परीक्षण अहवालात निष्पन्न झाले आहे. विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी 2015-16 आणि 2016-17 आर्थिक वर्षातील चौकशी अहवाल तत्कालीन प्रादेशीक सहसंचालकांकडे सादर केला होता. त्या अहवालातही नियमबाह्य ॲडव्हान्स वाटप केल्याचे नमूद करण्यात आले होते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला ती रक्कम वसूल करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, ती रक्कम वसूल न झाल्याने साखर विभागाचे विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना ही नोटीस दिली आहे. येत्या १५ दिवसांत या नोटिशीवर समाधानकारक खुलासा करावा; अन्यथा सहकार कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
आमचे संचालक मंडळ सत्तेवर येण्यापूर्वीच्या संचालक मंडळाने ट्रॅक्टर मालक, ऊसतोडणी मुकादम आणि मंगळवेढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना ॲडव्हान्स स्वरूपात 10 कोटी 45 लाख रुपये दिल्याची तक्रार एका सभासदाने केली होती. त्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये तत्कालीन संचालक मंडळ दोषी आढळून आले आहे. त्यानंतर वसुलीची कारवाई सुरु झाली आहे, असे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.