
Pune, 11 February : माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा पुण्यातील लोहगाव विमानतळावरून सोमवारी दुपारी गायब झाला होता. मात्र, सावंतांनी अपहरण झाल्याचे सांगून सरकारी यंत्रणेला वेठीस धरले हेाते. वास्तविक ऋषिराजचा त्याच्या वडिलांसोबत म्हणजे तानाजी सावंतांसोबत वाद झाल्यानंतर तो बँकॉकला निघाला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते सुनील माने यांनी करत सरकारी यंत्रणेला वेठीस धारणाऱ्या तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही माने यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस सुनील माने म्हणाले, माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा सोमवारी (ता. 10 फेब्रुवारी) कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. तो मित्रांसह लोहगाव विमानतळावरून चार्टर्ड विमानाने मित्रांसह बँकॉकला निघाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तानाजी सावंत यांनी त्यांचं राजकीय वजन वापरून त्यांच्या मुलाला परत आणले. मात्र, त्यासाठी शासकीय यंत्रणांना वेठीस धरण्यात आले.
एखादी व्यक्ती हरवल्याची तक्रार घेऊन सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा पोलिसांकडे जाते, तेव्हा पोलिस तो गुन्हा तत्काळ नोंद करत नाहीत. त्या व्यक्तीचा सुमारे २४ तास शोध घेतल्यानंतर त्याबाबतची तक्रार घेतली जाते. त्यानंतर पोलिस अपहरण अथवा बेपत्ताचा तपास सुरु करतात. ऋषिराज सावंत (Rishiraj Sawant) याच्या बाबतीत मात्र असे घडले नाही. तानाजी सावंतांनी फोन करून पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती दिली होती. त्यानंतर तत्काळ सिंहगड पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंद करण्यात आली, असेही सुनील माने (Sunil Mane) यांनी स्पष्ट केले.
सुनील माने म्हणाले, ऋषिराजचे त्याच्या वडिलांसोबत म्हणजे तानाजी सावंत यांच्यासोबत वाद झाल्यानंतर तो बँकॉकला निघाला होता. मात्र, त्यांच्यातला गृहकलह लपवून ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंत यांनी खोटी माहिती दिली. त्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सूचना केल्या. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना सूचना केल्या. त्यानंतर त्याचे काही तरी बरे वाईट होईल; म्हणून एफआयआर दाखल करण्यात आला. अशाप्राकारे चुकीच्या माहितीच्या आधारे ऋषीराजचे विमान परत पुण्यात बोलवण्यात आले.
शासकीय यंत्रणेचा कशा प्रकारे दुरुपयोग केला जातो. यंत्रणांना कशा प्रकारे वेठीस धरले जाते, याचे उदाहरण पुण्यात सोमवारी पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोटी माहिती देणे, शासकीय यंत्रणांना वेठीस धरणे, घरातील भांडणाचा विषय सार्वजनिक करून त्यासाठी शासकीय यंत्रणांचा त्यासाठी वापर करणे, हे कायद्याने गुन्हा ठरवला पहिजे. त्यासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.