Ahmednagar News : 'जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचे पुत्र, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्यावर ३५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालाने दिलेले असतानाही, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी जाणूनबुजून विलंब करत गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आरोपी शिवाजी कर्डिले व इतरांना वेळ मिळाल्याने त्यांनी या आदेशास न्यायालयातून स्थगिती मिळवली,' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. (Latest Marathi News)
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी न्यायालायाचा अवमान केला असल्याने त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. शिवाजी कर्डिल यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे २० गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना तातडीने तडीपार करावे, अशी मागणीही प्राजक्त तनपुरे यांनी पोलिसांकडे केली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी अॅड.अभिषेक भगत यांच्यावर बुधवारी दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा. त्यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना त्वरित पोलिस संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस उप-अधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे केली.
जर ८ दिवसात या मागण्यांवर काही कार्यवाही झाली नाही तर पोलीस अधिक्षक कार्यालयात आमरण उपोषण करू, असा इशाराच तनपुरे यांनी दिला. त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी व पोलिस उप-अधीक्षक अनिल कातकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
माजी आमदार कर्डिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास का विलंब केला गेला? तसेच तोफखाना पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता अॅड.अभिषेक भगत यांच्यावर अॅट्रॅोसिटीचा गुन्हा दाखल कसा केला? या मुद्यांवर आमदार तनपुरे, अभिषेक कळमकर, बाबासाहेब हराळ, दिलीप सातपुते यांनी पोलीस उप-अधीक्षक अनिल कातकडे यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणी तातडीने अहवाल मागून घेतो व पूर्ण चौकशी करतो, असे आश्वासन कातकडे यांनी शिष्टमंडळास दिले.
यावेळी तनपुरे म्हणाले, "अॅड. अभिषेक भगत व शिवाजी कर्डिले यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहेत. त्यांची बुऱ्हाणनगर परिसरात असलेल्या वडिलोपार्जित जमीन बळकावण्यासाठी शिवाजी कर्डिले त्यांना दमदाटी करत आहेत. जाहीरपणे दहशत निर्माण करत आहेत. याबाबाबत अभिषेक भगत यांनी न्यायालयात फिर्याद दिल्यावर न्यायालयाने कोतवाली पोलिसांना कर्डिले व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे ८ सप्टेंबर रोजी निर्देश दिली होते. मात्र पोलिस अधिक्षकांनी जाणूनबुजून विलंब करत १२ तारखेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने समोरच्या व्यक्तींनी या आदेशास स्थगिती मिळवली आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.