राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar News : कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला आज ( ता. 13) दुपारच्या सुमारास काळे फासण्यात आले. हा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केला असल्याची माहिती असून कर्जत बाजार समिती सभापती-उपसभापती निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे एक मत फुटून आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या उमेदवारांना गेल्याने पवार गटाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातून सदर प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.
निषेध व्यक्त करणारे कार्यकर्ते रोहित पवार समर्थक असल्याचे बोलले जात आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीसंदर्भात राष्ट्रवादीचे मत फुटल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती राम शिंदे (Ram Shinde) गटाचे निवडून आले. त्यामुळे तो राग मनात धरून रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत कर्जत येथील राजेंद्र फाळके यांच्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहीत घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राम शिंदे यांच्या गटाचे 9 तर रोहित पवार यांच्या गटाचे 9 उमेदवार निवडून आले होते. त्यातूनच सभापती उपसभापतीची निवड झाली. या निवडणुकीमध्ये दोन्ही जागा राम शिंदे यांच्या गटाला मिळाल्याने रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
नुकतेच जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना पुरेसं संख्याबळ पाठीशी असतानाही पराभव झाला होता. त्याही वेळी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस यांच्या गटातील दोन मते फुटल्याचे आणि ही मते राष्ट्रवादी पक्षाचीच सदस्यांची असल्याची मोठी चर्चा झाली होती. युवक चे कपिल पाटील आणि घुले समर्थक कार्यकर्त्यांनी याबाबत थेट पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर पक्ष शिस्त भंगाची कारवाईची मागणी केली होती.
या संदर्भात स्वतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगरमध्ये आल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त करत संबंधितांना आपल्या पद्धतीने कडक शब्दात इशारा दिला होता. त्यानंतर आता कर्जत बाजार समितीमध्येही राष्ट्रवादीचे एक मत फुटल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाल्याचे समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.