Sangali BJP President Selection News : राज्यात एकीकडे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या घडामोडी घडत असताना सांगली भाजपात (BJP) मात्र वेगळ्याच गोष्टींसाठी हालचाली सुरु आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपेक्षा जिल्हापरिषद आणि महापालिकांच्या निवडणुकीत महत्त्व वाढवण्यासाठी भाजपमधील अनेक वरिष्ठ मंडळींनी जिल्हाध्यक्षपदासाठी रांगा लावल्या आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत्या आठ-दहा दिवसात सांगलीच्या (Sangali Politics) जिल्हाध्यक्षपदाची घोषणा करणार असल्याने इच्छुकांनी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्हाध्यक्षपदाला महत्व असल्याने या पदासाठी मोठे नेतेही या शर्यतीत उतरल्याचे दिसत आहे. राज्यात आणि केंद्रातही भाजप सत्तेत आहे. येणारा काळही निवडणुकांचा असल्याने सांगलीत भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस वाढली आहे.अनेक बड्या नेतेमंडळीही या जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशीकांतदादा भोसले, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, शिराळ्याचे सत्यजित देशमुख हे नेतेमंडळी इच्छुक आहेत. पण विशेष बाब म्हणजेच खुद्द खासदार संजयकाका पाटील हेदेखील या इच्छुकांच्या यादीत आहे. तर माजी आमदार नितीन शिंदे, महापालिकेतील भाजपचे नगरसेवक युवराज बावडेकर, प्रकाश ढंग आणि चार वर्षांपूर्वी शहर जिल्हाध्यक्षपदाचा कारभार सांभाळणारे नगरसेवक शेखर इनामदार हेदेखील शहर जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.
यापूर्वी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद होते. त्यांच्याकडे हे पद असताना गेल्या सहा वर्षात ग्रामीण भागातही भाजपने आपला दबदबा निर्माण केला. याचा फायदा म्हणजे भाजपने (BJP Politics) सांगली महापालिकाही ताब्यात घेतली. यासोबतच तासगाव, इस्लामपूर नगरपालिकेतही भाजपने सत्ता मिळवली. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषदेतही अपक्ष, शिवसेना आणि रयत विकास आघाडीला सोबत घेऊन भाजपने पाच वर्षे सत्ता राखली. सांगलीतील दहापैकी आठ पंचायत समितीवरही भाजपने सत्ता काबीज केली. या सर्व यशामागे पृथ्वीराज देशमुख यांचे प्रयत्न होते. पण आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदासाठी ते फासरे इच्छुक दिसत नाहीत. पण सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सध्या दीपक शिंदे यांच्याकडे शहराचे जिल्हाध्यक्षपद आहे. ग्रामीण भागात त्यांचे वास्तव्य असले तरीही पक्षाने शहरातील उमेदवारांना डावलून त्यावेळी शिंदेंना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली. पण त्यांच्या कार्यकाळातच राष्ट्रवादीने भाजपमध्ये फूट पाडून महापौरपद मिळवले. पण पक्षानेही त्यांना याबद्दल कधी विचारणा केली नाही.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.