

Solapur, 17 February : जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यानच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या (प्रशासक आणि ग्रामपंचायत सदस्यांचा) राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 558 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येत्या शुक्रवारपासून (ता. 20 फेब्रुवारी) या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रम जाहीर केला असून ही अंतिम प्रभाग रचना चार मे रोजी जाहीर होणार आहे.
दरम्यान, प्रभाग रचनेचे संपूर्ण कार्यक्रम अंतिम होण्यासाठी उन्हाळातील मे महिना उजाडणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होते, त्यावर हरकती आणि आक्षेप मागवून काही दिवसांनी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होते. तोपर्यंत पावसाळ्याला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी दिवाळीत मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतींचा कालावधी येत्या डिसेंबरपर्यंत संपणार आहे. यातील काही ग्रामपंचायतींवर प्रशासक आहे, त्यांचीही मुदत डिसेंबरअखेर पूर्ण होऊ शकते, अशा ग्रामपंचायतींचा अधिनियम, १९५८ मधील २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २२ अन्वये कलम १० मधील सुधारीत केलेल्या तरतुदीनुसार हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम पुढीलप्रमाणे
तहसीलदारांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोज करुन प्रत्येक गावाचे नकाशे २० फेब्रुवारीपर्यंत अंतिम करणे, तसेच संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करण्यात येणार आहे.
प्रारुप प्रभागरचनेची तपासणी करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी व संबधित मंडल अधिकारी यांचा समावेश असलेली समिती नेमण्यात येणार आहे. ती समिती पाच मार्चपर्यंत प्रारुप प्रभाग रचनेची तपासणी करणार आहे.
संबंधित समितीला प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी ११ मार्चपर्यंत सादर करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी हे नमुना ब (प्रारुप प्रभाग रचना) ची संक्षिप्त तपासणी करतील. त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करून संबंधित प्रारूप राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी १७ मार्चपर्यंत सादर करतील.
राज्य निवडणूक आयोग किंवा त्याने प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी हे आवश्यक असल्यास प्रस्तावात दुरूस्ती करणे व त्यास २३ मार्चपर्यंत मान्यता देतील. या दुरुस्त्या अंतर्भूत करुन प्रारुप प्रभाग रचना तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी किंवा समितीच्या सर्व सदस्यांनी ३० मार्चपर्यंत स्वाक्षरी करावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
हरकती अन् सूचना मागविणे
प्रारुप प्रभाग रचनेला (नमुना ब) व्यापक प्रसिध्दी देऊन तहसीलदार यांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी ०७ एप्रिलपर्यंत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर १३ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व हरकती आणि सूचना सुनावणीसाठी १६ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केल्या जाणार आहेत.
प्रारूप प्रभाग रचनेबाबत प्राप्त झालेल्या सर्व हरकती आणि सूचनांवर उपविभागीय अधिकारी हे २१ एप्रिलपर्यंत सुनावणी घेणार आहेत. आलेल्या प्रत्येक हरकती आणि सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाणार आहेत.
प्रभाग रचना अंतिम करणे
उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी हे २८ एप्रिलपर्यंत प्रभाग रचना अंतिम करुन राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी हे (नमुना अ मध्ये) चार मे रोजी प्रसिध्द करतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.