

Satara, 01 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे बहुतांश मतदार हे महायुती नेत्यांच्या ऐकण्यामधील आहेत, निवडणुकीच्या निकालात फरक पडणारे मतदान महाविकास आघाडीकडे नाही, महायुतीच्या विचारांचं तब्बल ९५ टक्के मतदार आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये योग्य तोडगा निघाल्यास जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोधही होऊ शकते, त्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी स्पष्ट केले.
सातारा विकास सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून मंत्री शिवेंद्रराजेंनी आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरला, त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजेंनी सातारा जिल्हा बॅंक बिनविरोध होण्याबाबत सूतोवाच केले.
ते म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या निर्देशानुसार झाला आहे. त्यांच्या सूचनेनुसार बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. पण, जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही.
सर्वच इच्छुकांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छाननीनंतर जागा वाटपावर काय निर्णय होईल, ते कळेल. जिल्हा बॅंक चांगली चालत असल्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी काम करावसं वाटतंय, त्यामुळेच आज इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत, असेही भोसले यांनी सांगितले.
ते म्हणाले, जागा वाटप जसं होईल, त्याप्रमाणे संबंधितांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घ्यावी, याची जबाबदारी पार पाडावी. मी, जयकुमार गोरे, मकरंदआबा पाटील, शंभूराज देसाई हे कॅबिनेट बैठकीमुळे मुंबईतच होतो, त्यामुळे भाजप ११ आणि शिवसेना-राष्ट्रवादी १० असा जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही. पण आज शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरून ठेवले आहेत.
त्या बैठकीबाबत गोरेंनी स्पष्टीकरण दिलंय
उदयनराजेंची भेट वेगळ्या विषयासंदर्भात होती. जिल्हा बॅंकेची निवडणूक पक्षीय पातळीवर न होता पक्षविरहीत व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आमची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. जयकुमार गोरे, उदयसिंह पाटील उंडाळकर आणि मकरंद पाटील यांच्यामध्ये झालेल्या बैठकीबाबत गोरे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ती भेट नव्हती, ती वेगळ्या गोष्टीसंदर्भातील बैठक होती, असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केलेले आहे, असे शिवेंद्रराजेंनी नमूद केले.
मतांच्या प्रमाणानुसार जागावाटप व्हावं
ते म्हणाले, मतांच्या प्रमाणानुसार जिल्हा बॅंकेचे जागावाटप व्हावं, असं भाजप म्हणून आमचं म्हणणं आहे. कुणाची किती मतं आहेत, हे सर्वांना माहिती आहेत. त्यानुसार सन्मानजनक जागावाटप व्हावं म्हणजे तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, अशी आमची अपेक्षा आहे. जिल्हा बॅंकेचं आमचं मतदान एकमुखी आणि एकगठ्ठा आहे. आमच्याकडे सर्वांत जास्त मतदान असल्याने एखादी तरी जागा जास्त मिळावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो.
शंभूराज देसाई आमच्यासोबतच
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक झाली, त्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. त्या दिवशी फक्त जयकुमार गोरे हे सोलापूरला गेल्यामुळे उपस्थित नव्हते. मात्र, पालकमंत्री देसाई हे महायुतीत असून बॅंक निवडणुकीत आमच्यासोबत आहेत, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
मकरंदआबांशी देसाईंचा फोनवरून संवाद
मंत्री भोसले म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई हे महायुतीमध्ये आहेत. पण परवाच्या बैठकीला ते उपस्थित नव्हते. मात्र मकरंदआबांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी मला काही सुनावणीच्या निमित्ताने मुंबईला जावं लागतंय, तुम्ही चर्चा करा. मी तुमच्यासोबत आहे, असे सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.