
Solapur, 13 July : अक्कलकोट माझ्यावर झालेला हल्ला हा माझ्या हत्येचा कटच होता. मात्र, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यामुळे मी वाचलो. ते भाजपचेच कार्यकर्ते असून ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात. माझ्यावर झालेल्या हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. पण माझ्यावर हल्ला करणारे आणि घडवून आणणाऱ्यांना निश्चितपणे सांगतो की ही शेवटाची सुरुवात आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे, अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी इशारा दिला आहे.
फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीने स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड हे आज अक्कलकोटमध्ये आले होते. त्या वेळी शिवधर्म प्रतिष्ठानचे दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यानंतर सोलापुरात माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी भाजप आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं टाकलं आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. कधी पक्ष फोडले जातात, कार्यकर्ते फोडले जातात. मग त्यांच्या मनासारखी गोष्ट करता आली नाही तर असे हल्ले घडवतात.
आम्ही सत्य विचारसरणीने कार्य करतो, आमचा विचार हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे. देशात मानवता प्रस्थापित व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम सुरू आहे आणि ते सुरू राहणार आहे. पण, काही सामाजिक संघटनेबद्दल गैरसमज पसरवले जातात. मग, हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मी त्याचा निषेध करणार नाही. पण हे ज्यांनी पण घडवून आणले आहे, त्यांना निश्चितपणे सांगतो की, ही शेवटाची सुरुवात आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रवीण गायकवाड म्हणाले, संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. राज्यकर्ते विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. आम्ही जेव्हा या कार्यक्रमाला पोचलो, तेव्हा पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती. मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती का? का ठरवून षडयंत्र घडलं होतं का? माझ्या जीविताला धोका होता का? असे प्रश्न उपस्थित होतात.
मी माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे जीवंत आहे. मला आनंद वाटतो की मला चांगलं काम करण्याची संधी असल्यामुळे नवीन जीवनाची संधी मिळाली आहे. आज माझ्या हत्येचा कट करण्यात आला होता. माझ्यावर तशा प्रकारचाच हल्ला झालेला आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, संभाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे मी जीवंत आहे. या हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असा आरोपही गायकवाड यांनी केला.
गायकवाड म्हणाले, आमची विचारधारेची लढाई आहे. देशातील सर्व जाती धर्म समान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांंची विचारधारा मांडत असताना कोणाला आवडत नसेल. पण माझ्यावर झालेला हल्ला हा काही सोपा नाही. या हल्ल्यामागे मोठा कट आहे. सरकारने तो उघड करावा. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी गृहमंत्र्यांवर येते, असे माझे म्हणणे आहे.
संभाजी ब्रिगेडवर जेव्हा हल्ला करतात, तेव्हा ते विरोधी विचारसरणीचेच आहेत. ते भाजपचेच कार्यकर्ते आहे. ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात. त्यांचं आमचं दोनवेळा संभाषण झालं आहे. त्यांचा आग्रह असा होता छत्रपती संभाजी ब्रिगेड असा करा. पण तांत्रिक अडचण अशी आहे की, सचिन कांबळे यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने रजिस्ट्रेशन केलेले आहे. धर्मादायक आयुक्तांकडे आग्रह केला तर ती संघटना रद्द केली पाहिजे किंवा ही संघटना त्यात सामाविष्ट केली पाहिजे. कायदेशीर बाब होती. आमचं बोलणं चाललं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.