
Solapur, 26 June : संस्था चालवताना आपण कुठंतरी कमी चुकलो. अडचणीत आलो म्हटल्यावर लगेच भाजप, शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज नाही. चूक केली असेल तर धाडसाने त्याला सामोरे जाण्याची गरज होती. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या संस्था, स्वतःला बळकट करण्यासाठी काही लोक पक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चितपणे पश्चाताप होणार आहे, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी नाव न घेता माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना लगावला.
मल्लिकार्जून पाटील यांच्या पुढाकाराने आज अक्कलकोटमध्ये काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी सिद्धाराम म्हेत्रेंवर (Siddharam Mhetre) टीका केली. ते म्हणाले, अक्कलकोटशी आमची म्हणजे वसंतदादा घराण्याची नाळ जोडलेली होती. ते संबंध पुढे चालू राहावेत, यासाठी मी आज अक्कलकोटला आलो आहे. अक्कलकोटला आल्यानंतरही आम्हाला प्रेरणा मिळते. स्वामी समर्थांचे दर्शनासाठी येतो, त्यांच्या दर्शनानंतर आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते.
खासदार विशाल पाटील म्हणाले, प्रणिती शिंदे यांनी आम्हाला अक्कलकोटला ((Akkalkot)) मेळाव्याला येण्याबाबत सांगितले तेव्हा ‘लहानसा हॉल असेल चार कार्यकर्ते जमले असतील, त्यांच्यासमोर भाषण करायचं आणि जायचं,’ असं वाटलं. पण, आम्ही अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तर फटक्याची आतिषबाजी, गाडीच्या पुढं मागं कार्यकर्त्यांची गर्दी होती, आम्ही म्हटलं, हॉलमध्ये कोणी आहे की नाही कुणास ठाऊक? हॉलमध्ये आलो तर आतमध्ये यायला जागा नाही, एवढी गर्दी होती.
आतमध्ये सभागृह अगोदरच खचाखच भरलेले होते. यातून तुम्ही दाखवून दिलं की, कोणीतरी गेला म्हणून पक्ष संपत नाही. काँग्रेस पक्षाची ही ताकद त्यांच्या विचारात आहे. काँग्रेस पक्षाचे काम करणारे सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे आमचे आजोबा कायम यायचे. मल्लिकार्जून पाटील यांचे वडील महादेवराव पाटील यांच्याशी वसंतदादांचे निकटचे संबंध होते, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
अक्कलकोटमध्ये काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की, येथील काँग्रेस कार्यकर्ते सामान्य माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरवू शकतात. तुम्ही एकत्र मोट बांधली आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहिलो तर पुढचा आमदार मल्लिकार्जून पाटील असतील, असेही पाटील म्हणाले.
आपल्यातील काही लोक भाजपसोबत गेल्यामुळे त्यांनी सत्ता काबीज केली आहे. आता फक्त हा महाराष्ट्र लुटण्याचे काम चालू आहे. महाराष्ट्राची परंपरा फार मोठी आहे. दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा. एवढी ताकत महाराष्ट्रात आहे. मात्र, महाराष्ट्राला लाचार करण्याचं काम दिल्लीवाल्यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील मलाई खायला मिळते, म्हणून हे चालू दिलं आहे, असेही ते म्हणाले.
विशाल पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गात जास्तीत जास्त पैसा कसा खाता येईल, कशा आपल्या तिजोऱ्या भरता येतील, एवढाच उपयोग महाराष्ट्राचा चालला आहे. तुमच्या खिशात थोडं टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर महाराष्ट्राच्या जीवावर राज्य करायचं, हा भाजपचा डाव आहे. लोकसभेला तुम्ही भरभरून मतं दिल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार बघायला मिळेल, असं आम्हाला वाटलं होतं. दुर्दैवाने आपण फसलो, तुम्ही आम्ही फसलो. आपण कमी पडलो. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आपण संपलो, असं का समजावं.
तो दिवस आता दूर नाही
दिल्लीत काहीतरी चालू आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसणार, हा दिवस आता लांब नाही. त्यानंतर गेलेले सगळे म्हणतील आम्हाला घ्या, आम्हाला घ्या त्यावेळी घ्यायचं का? असा सवालही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.