मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या जाहीर सभेत ‘तुम्ही १०६ वा आमदार द्या; मी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो’ असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही मागच्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आले, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (We did correct program of Mahavikas Aghadi : Devendra Fadnavis)
मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगर अन्ड डिस्टीलरीज प्रा.लि.च्या प्रथम गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, (स्व.) सुधाकर परिचारक हे विधानसभा निवडणुकीला उभे होते. त्यावेळी मी एका प्रचासभेला आलो होतो. मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी देणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना मी करणार, असा शब्द दिला होता. मात्र, ते आश्वासन दिल्यानंतर आपलं सरकारच गेलं. पण मी सांगितलं होतं की, मी पुन्हा येईन. तुमची योजनासुद्धा मी पुन्हा येण्याची वाट पाहत बसली. मधल्या सरकारने फाईल सरकावलीदेखील नाही.
पोटनिवडणुकीत तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून दिलं. पण त्यांच्याही सभेत मी तेच आश्वासन दिले होते. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम मी करणार. मला आनंद आहे की, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे सांगितले हेाते की १०६ वा आमदार द्या; आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो, त्याप्रमाणे आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आहे. तुमच्या आणि पांडुरंगाच्या आशीर्वादने सरकार आले. आल्याबरोबर सरकारने या कामाला चांगली गती दिली. आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा केला, तसेच माजी आमदार प्रशांत परिचारकही माझ्याकडे यानिमित्त यायचे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सर्व मान्यता घेण्यात आलेल्या आहेत. आता फक्त नवीन दरसूचीप्रमाणे कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळवून घेऊन काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे समाधान आवताडे यांनी दिलेला मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न सुटेल आणि तुम्हाला लोकांपुढे ताठ मानेनेच जाता येईल, असा विश्वास मी यानिमित्ताने देतो, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे साखर कारखानदारी जीवंत राहिली आहे, त्यानंतर सातत्याने एफआरपी वाढवण्यात आली. एफआरपी देण्यासाठी अध्यादेश काढला. कारखानदारांनी उपपदार्थनिर्मितीवर भर दिला पाहिजे, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ऊस उत्पादकांच्या हाती पैसे येतील. सततच्या पावसाने नुकसान झाले तरी ६५ मिलीमीटरची अट न ठेवता मदत सुरू केली. मागील सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पांडुरंगाची इच्छा होती म्हणून शेतकरीहिताचे सरकार सत्तेवर आले. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका क्लिकवर ७ हजार कोटींची मदत केली, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी आमदार आवताडेंनी झोकून दिले, त्यांना उपमुख्यमंत्रीच पाठबळ देत आमदार आवताडेचे समाधान केले. केंद्र सरकारमुळे साखर कारखानदारी टिकून आहे. शेतकऱ्यांचा नेता भासवून शेतकरी मागे फिरत राहिला पाहिजे, या भूमिकेतून खेळवत ठेवले. दिल्लीत शिष्टमंडळ न्यायचे आणि रिकाम्या हाती परत आणायचे. वीस वर्षे साखर कारखानदारी सांभाळायला दिली, त्यांनीच ती विकायला काढली, याचे प्रायश्चित्त कोण करणार, असा सवाल त्यांनी केला.
आवताडे म्हणाले की, महाविकास सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून पांडुरंगाचा आशीर्वाद घेताना उपमुख्यमंत्र्यांमुळे बंद झालेला नंदूरचा कारखाना सुरू केला. त्यातून हजारोंना रोजगार मिळाला. तीन महिन्यांत ६०० कोटींचा निधी मतदारसंघासाठी दिला असून मंगळवेढ्याचे राजकारण पाण्यावर झाले या पाण्याने राजकारणाची आग भडकावली. पण आता उपमुख्यमंत्री या कामासाठी कामाला लागले आहेत, त्यामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्ण होणार हे निश्चित आहे.
यावेळी खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख, रणजीतसिंह मोहिते-पाटील, राम सातपुते, शहाजी पाटील, लक्ष्मण ढोबळे, प्रशांत परिचारक, हर्षवर्धन पाटील, विजयराज डोंगरे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.