Madha : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार राष्ट्रवादीमधील आमदारांचा मोठा गट सोबत घेऊन शिंदे - फडणवीस सरकारमध्ये डेरेदाखल झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. याचदरम्यान,भाजप खासदाराने काँग्रेसबाबत खळबळजनक दावा केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर( Ranjit Naik-Nimbalkar) यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीमध्ये राहून काही उपयोग नाही अशी काँग्रेस आमदारांची भावना आहे. त्यामुळे ते सत्तेत सामील होतील आणि तिकडे फक्त शिल्लक राष्ट्रवादी आणि ठाकरे गट राहील असं धक्कादायक विधान निंबाळकर यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच आघाडी फुटायला जबाबदार ठरणार
खासदार निंबाळकर म्हणाले, काँग्रेस पक्ष लवकरच महविकास आघाडीमधून बाहेर पडणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षच महाविकास आघाडी फुटायला जबाबदार ठरणार आहे. काँग्रेसमधील काही आमदार सत्तेत येण्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष सावध
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस(Congress) पक्षही सावध झाला आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर काँग्रेस पक्षाने बैठकांचा धडाका लावला असून सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील विविध मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याचवेळी अजित पवारांनंतर रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर देखील ते दावा ठोकण्याच्या तयारीत असून बैठकांचा धडाका लावला आहे.
या बैठकांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर पक्ष बारकाईने नजर ठेवून असताना सावध भूमिकेत असल्याचे समोर आले आहे.तसेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आम्ही मजबूत, एकजूट आणि महाविकास आघाडीत आहोत असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
पृथ्वीराज चव्हाणांचा दावा....
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एका मुलाखतीत भाजपने याआधीदेखील काँग्रेस पक्षाला फोडण्याचा प्रयत्न केलाय. दोन तृतीयांश संख्या म्हणजे 30 आमदार होतात. त्यामुळे पक्ष फोडणं इतकं सोपं नाही. कदाचित एखाद-दुसरा भाजपात जाऊ शकतो असं ते मागे म्हणाले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.