

Satara, 11 August : विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून इच्छूक असूनही तिकिट न मिळालेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी पुन्हा एकदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. आपण केलेल्या मदतीमुळे अनेकांनी विजयाचा गुलाल उधळला. आपण निवडणुकीत उतरलो की यशस्वी होऊन दाखवतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे, त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक मी स्वत: ताकदीने लढवणार आहे, असे शेखर गोरेंनी जाहीर केले.
सातारा जिल्हा बँकेत आपण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष करत माण सोसायटी मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून आलो होतो. सध्या अनेकांनी जिल्हा बॅंकेच्या संचालकपदासाठी गुडघ्याला बाशींग बांधले असली तरी जिल्हा बँकेत संचालक म्हणून आपणच जाणार असल्याचे विद्यमान संचालक शेखर गोरे यांनी स्पष्ट केले.
शेखर गोरे म्हणाले, जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सर्वच विरोधक एकत्र येत फक्त शेखर गोरेला संचालक होऊ द्यायचे नाही, असा अजेंडा चालवला होता. आपल्याला थांबवण्यासाठी सर्व हेवेदावे बाजूला ठेवत राजकीय तह करत आपल्या विरोधात सर्वजण एकवटले होते. मात्र त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत आपण जिल्हा बँकेत संचालक म्हणून प्रवेश केला होता.
गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली. या संधीमुळे शेतकरी,सभासदांचे विविध प्रश्न सोडवता आले. या निवडणुकीत कोणी कितीही ताकद लावली असली तरी आपली भूमिका आत्तापासूनच स्पष्ट आहे. ‘निवडणूक कितीही कठीण असो, राजकीय आव्हाने कितीही असोत; ठरावांचे गणित जुळवत जिल्हा बँकेत पुन्हा संचालक म्हणून जाण्याचा आपला निर्धार कायम आहे, असे शेखर गोरे यांनी स्पष्ट केले.
आपण एखाद्याला दिलेला शब्द शेवटपर्यंत पूर्ण ताकदीने पाळतो, हे सर्व सातारा जिल्ह्याला माहिती आहे. लोकसभा, विधानसभा, म्हसवड नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण केलेल्या मदतीमुळे अनेकांना विजयाचा गुलाल उधळता आला. शेखर गोरे ज्यांना मदत करतो, तो विजयाच्या गुलालात असतो. अन आपण एखाद्या निवडणुकीत लक्ष घातले की ती निवडणूक यशस्वी करून दाखवतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे, त्यामुळे बँकेची निवडणूक मी स्वत: लढवणार आहे, त्यामुळे पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माण-खटावच्या राजकारणात नवीन काहीतरी घडणार?
शेखर गोरे यांना दिलेले शब्द पाळले गेले नाहीत, त्यामुळे त्यांची उघड नाराजी दिसून येते. सध्या ते त्या विषयावर नो कमेंटस व सायलेंट भूमिकेत असून त्यांचा हा बदललेला सायलेंट स्वभाव व नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार व कोणाला फटका बसणार, हे समजत नाही, त्यामुळे शेखर गोरेंच्या मनात नक्की चाललंय. त्यांच्या या भूमिकेमुळे माण खटावच्या राजकारणात काही नवीन घडणार की काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तुल्यबळ लढतीत शेखर गोरेंच्या बाजूने कौल
सातारा जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत माण मतदारसंघातील सर्व विरोधक एका बाजूला, तर शेखर गोरे एकटे एका बाजूला होती. असे असूनही त्यांनी तुल्यबळ लढत दिली होती. सर्व विरोधकांना मिळून ३६, तर एकट्या शेखर गोरेंना ३६ अशी समान मते मिळाली होती, त्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. चिठ्ठी शेखर गोरेंच्या बाजूने कौल दिल्याने सर्व विरोधाकांच्या विरोधातली शेखर गोरेंची एकाकी झुंज यशस्वी झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.