
Solapur, 30 June : स्वतःच्या शिवपार्वती लॉजमध्ये राहायला आलेल्या महिलेचा रुममध्ये घुसून विनयभंग करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, सपाटे यांच्या विनयभंग प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली असून या प्रकरणात कठोर कारवाई करून अहवाल पाठविण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.
दरम्यान, मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. पोलिसांनी सपाटे यांची चौकशी करून त्यांना सोडून दिले आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची अट असणार आहे. न्यायालयात चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.
सोलापूर (Solapur) शहरातील लकी चौकात मनोहर सपाटे यांच्या मालकीचा शिवपार्वती लॉज आहे. न्यायालयीन कामासाठी पुण्याहून सोलापूरला आलेली संबंधित महिला ही १४ जून रोजी सपाटेंच्या शिवपार्वती लॉजमध्ये उतरली होती. सपाटे हे १७ जून रोजी मध्यरात्री बारानंतर संबंधित महिलेच्या रूममध्ये घुसले. त्या वेळी त्यांनी छेडछाड करीत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.
मनोहर सपाटे हे राजकीय नेते आहेत, त्यामुळे कोणी विश्वास ठेवणार नाही. तसेच, शिवपार्वती लॉज हा त्यांच्याच मालकीचा असल्याने सीसीटीव्ही फुटेज नष्ट करतील, म्हणून संबंधित महिलेने त्यांचे २४ जून रोजी स्टिंग ऑपरेशन केले, तो व्हिडिओ पाेलिसांना दाखवला, त्यानंतर सपाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी
दरम्यान, विनयभंगाची तक्रार आणि सोशल मीडियात त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्षाची जनसामन्यांमधील प्रतिमा डागाळल्याने सपाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सपाटे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सपाटे यांच्या वयाचा विचार न करता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात सोलापूरच्या पोलिस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. चाकणकर यांनी आदेशात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची बातमी माध्यमांतून प्रसारित होत आहे. या प्रकरणी ता. २६ जून रोजी फौजदार चावडी पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता ७४, ७५, ७५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राज्य महिला आयोगाने पोलिस आयुक्त, सोलापूर यांना या प्रकरणी आवश्यक कारवाई करावी आणि आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.