
Pune, 28 August : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वार्थाने ‘दादा’ असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत चॅलेंज देऊन त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे प्रकाशझोतात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खंबीर साथ देणाऱ्या बारामतीतील कार्यकर्त्यांसाठी युगेंद्र हे थेट ॲक्सेस ठरण्याच्या मार्गावर होते. मात्र, नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत आपण अजितदादांच्या विरोधात यापुढे उभे राहणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर युगेंद्र पवारांनी केलेली घोषणा आत्मघातकी ठरणार की ठरवून घेतलेली माघार आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षातील सर्वाधिक आमदार, खासदार आणि नेतेमंडळींनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पसंती दिली होती. बहुतांश नेतेमंडळी अजित पवारांसोबत गेल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना शरद पवार यांच्या पक्षात महत्व आले होते. नव्या पिढीतील तरुणांमध्ये नेतृत्वगुण शोधून त्यांना ताकद देण्याचे काम शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत केले. पवारांनी घेतलेल्या कष्टाचे परिणामही लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले होते.
विधानसभेला अनेक नवख्या उमेदवारांना पवारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यातच लोकसभा निवडणुकीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेपासूनच श्रीनिवास पवार, शर्मिला पवार आणि त्यांचे चिरंजीव युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरले होते. तो अजितदादांसाठी धक्का होता. कारण आतापर्यंतच्या अनेक घडामोडीत श्रीनिवास पवार हे अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उभे करण्यात आले होते. त्या निवडणुकीत युगेंद्र यांचा पराभव झाला. पण नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी यापुढे अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, युगेंद्र पवार यांनी हा निर्णय का घेतला, याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या कुटुंबात जे काही झालं, ते मला वैयक्तिक अजिबात आवडलं नव्हतं. आताही मला ते आवडत नाही. ते कुठंतरी थांबलं पाहिजे, असं माझं मत आहे. शेवटी हे कुटुंब आहे, सगळ्यांनी मोठ्या कष्टातून हे उभे केलेले आहे. त्यामुळे आता कुठंतरी थांबलं पाहिजे, असेही युगेंद्र पवार यांनी त्या मुलाखतीत म्हटले होते.
वास्तविक, स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीच्या तोंडावर युगेंद्र पवार यांनी घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे. कारण, अजितदादांसारख्या बड्या नेत्याच्या समोर तेही बारामतीत उभा राहणं सोप नाही. अनेक संस्थांचे जाळे, आर्थिक नाड्या, कार्यकर्ते, सत्ताधारी असणाऱ्या दादांच्या विरोधात जाण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. पण, युगेंद्र पवारांच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ते आता कोणाच्या नेतृत्वात लढणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडू शकतात.
युगेंद्र पवार यांचा हा निर्णय आत्मघातकी ठरणार का? की ठरवून घेतलेली माघार आहे? याचीही चर्चा आता आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा अधूनमधून सुरू असते, त्याचा ही एक प्रक्रिया नाही ना? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.