
कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणावर बोलकाना आमदार संजय गायकवाड म्हणाले, "मी ज्याला मारहाण केली तो वेटर नव्हता तर तो मॅनेजर होता. आता त्याला मालकाने सस्पेंड केलं आहे. तो लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता. मला स्वतःला पोटाचा आजार आहे. मी 20 वर्षांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त आहे आणि ते जर मला विषारी जेवण देणार असतील आणि मला जर काही त्रास होणार असेल तर माझी रिअॅक्शन चुकीची नव्हती. माझा मार्ग चुकीचा आहे पण माझ्या कृतीमुळे येणाऱ्या काळात लाखो महाराष्ट्रातील नागरिकांचं आरोग्य वाचणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केली आहे. या तालुक्यातील 33 गावांतील 96 कामांमध्ये एकाच मजूराचा फोटो वापरून बिले काढली आहेत. या प्रकरणी 5 कोटी 18 लाखांची बिले काढल्याचं उघडकीस आलं आहे. तर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
ड्युटीवर असताना अचानक बेशुद्ध पडलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी सातारा रस्त्यावर घडली. धनंजय वणवे असे त्यांचे नाव आहे. ते गंधर्व लॉन्स परिसरात वाहतूक नियमन करीत होते. अचानक खाली पडल्यानंतर त्यांना तातडीने चौकातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते मतदारसंघनिहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राजकीय निवृत्तीनंतर पुढील आयुष्यात काय करणार हे त्यांनी सांगितलं आहे. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करायचं ठरवलं आहे. शिवाय निवृत्तीनंतरचं आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात घालवणार आहे."
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 20 लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे दहा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची मंदिर समितीकडे नोंद झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा जगभरातील विविध देशांवर टेरिफ लागू करण्याचा आदेश काढला आहे. याबाबत अमेरिकेने 22 देशांना पत्र पाठवत नवे टेरिफ दर किती असणार याबाबतची माहिती देण्यात आली आहे. फिलिपाईन्स, श्रीलंका, ब्रुनेई, अल्जेरिया, लिबिया, इराक, मॉलडोव्हा आणि ब्राझील या देशांवर अमेरिकेने 20 ते 50 टक्के टेरिफ आकारला आहे. 1 ऑगस्टपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.