PDPC Committee Election : ४० सदस्यांची समिती, पण निवडणूकच रखडली! जिल्हा नियोजनाचा कारभार आमदार-खासदार, सुनेत्र पवारांच्या हातात?

Pune District Planning Committee : जिल्हा नियोजन समितीत आमदार आणि खासदार हे केवळ विशेष निमंत्रित सदस्य असतात आणि त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. मात्र, सध्या सर्व निर्णय आमदार खासदारांच्या हातात असल्याचे पाहायला मिळत आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीला अद्याप मुहूर्त लागत नसल्याने पुण्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अधिकार डावलले जात असल्याचा आरोप करत, जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत निधीचे वितरण आणि खर्च थांबवावा, अशी आक्रमक मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीवर महानगरपालिका पुणे व पिंपरी-चिंचवड मधून २०, जिल्हा परिषदेतून १८, तर नगरपालिका आणि नगरपरिषदांमधून २ असे एकूण ४० सदस्य निवडून दिले जातात. या सदस्यांना विकासकामांचे नियोजन, प्रस्तावांना मंजुरी आणि कामकाजात मतदानाचा महत्त्वाचा अधिकार असतो.

दुसरीकडे, आमदार आणि खासदार हे केवळ विशेष निमंत्रित सदस्य असतात आणि त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. मात्र, सध्या सर्व निर्णय आमदार खासदारांच्या हातात असल्याचे पाहायला मिळत आहे तर समितीची निवडणूकच रखडल्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना विकासकामांच्या प्रक्रियेपासून पूर्णपणे दूर ठेवले जात आहे.

महायुतीत नियुक्त्यांचा तिढा?

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असले, तरी जिल्हा नियोजन समितीवरील शासननियुक्त आणि राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणुका अद्याप झालेल्या नाहीत. तिन्ही घटक पक्षांमधील राजकीय प्रतिनिधित्व आणि नियुक्त्यांच्या तिढ्यामुळेच ही निवडणूक जाणीवपूर्वक लांबणीवर टाकली जात आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पालकमंत्री सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

निवडणूक रखडल्याने सध्या केवळ मर्यादित प्रशासकीय यंत्रणा, पालकमंत्री आणि आमदार-खासदारांच्या स्तरावरच निधीवाटपाचे निर्णय घेतले जात असल्याची सदस्यांची तक्रार आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हक्कांपासून वंचित ठेवू नका

याप्रकरणी जिल्हा परिषदेतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही जनतेतून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य आहोत. डीपीसी ही स्थानिक विकासकामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेली महत्त्वाची यंत्रणा आहे. सध्या झेडपीच्या १८ सदस्यांना त्यांच्या वैधानिक हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. पालकमंत्र्यांनी तातडीने निवडणूक घेऊन आम्हाला या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे. अशी मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.