

Farmer Loan Waiver Scheme 2026 Maharashtra: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026' राज्य शासनाने जाहीर केली आहे.
नैसर्गिक आपत्ती, पावसाची अनिश्चितता, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागते. शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्ती मिळून पुन्हा त्यांना कर्ज उपलब्ध होणार आहे.
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार मानला जातो. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शेती अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने ही व्यापक योजना लागू केली आहे.
लोककल्याणकारी कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी लोकविकासासाठी आजपर्यंत केलेले शेती, सिंचन, जलव्यवस्थापन असे कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.
यापूर्वीही राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 आणि प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 यांसारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला होता.
मात्र, अनेक शेतकरी कर्जमुक्तीनंतर पुन्हा थकीत कर्जाच्या चक्रात अडकत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (मित्र) प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील अस्थिरता, वारंवार निर्माण होणारी कर्जमाफीची गरज आणि भविष्यातील उपाययोजनांचा सखोल अभ्यास करून शासनाला शिफारसी सादर केल्या. त्यानुसार तातडीचा दिलासा देण्यासाठी ही नवी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, “राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना‘ ही ऐतिहासिक योजना आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50 हजार रुपयांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे. यासाठी पूर्वीची मर्यादा हटविण्यात आली आहे.
राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आकडेवारीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या योजनेत पूर्वी लाभापासून वंचित राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनादेखील आता 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.
तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्ज उचलून वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशी शासनाची भूमिका आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.