
Mumbai News : भाजपनं विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच धर्तीवर संघटनात्मक पातळीवर बदलांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्त्या केल्यानंतर मंगळवारी (ता.1 जुलै) बहुप्रतिक्षित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची निवड करत भाजपनं मोठं पाऊल टाकलं. यानंतर मावळत्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) एक पत्र लिहित भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.
भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम लागू असल्यानं चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा झडू लागल्या होत्या. यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या रुपानं आता भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.
मुंबईतील भाजपच्या (BJP) अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. चव्हाण हे आधी कार्याकारी प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्यावर आता महाराष्ट्र राज्य भाजपची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यानंतर मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आभार मानणारं भावनिक पत्र लिहिलं आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पत्रात कवि ना.धो.महानोरांच्या कवितेच्या ओळींचा संदर्भ देत आपल्याप्रदेशाध्यक्ष आणि भाजपमधील आजपर्यंतच्या वाटचालींवर भाष्य केलं आहे. याचदरम्यान,त्यांनी पक्षश्रेष्ठी,पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार तर मानलेच याचसोबत त्यांनी माफीही मागितली आहे.हे पत्र राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.
आपले मनापासून आभार प्रिय कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो,सस्नेह नमस्कार!कविवर्य ना.धो.महानोरांच्या ओळी आहेत,कोणती पुण्ये अशी येती फळाला,जोंधळ्याला चांदणे लगडून जावे !! अशीच काहीशी भावनिक अवस्था माझी झाली आहे. साधारण 35 वर्षांपूर्वी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्याच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केल्याचं बावनकुळे पत्राच्या सुरुवातीला म्हणतात.
तसेच त्यांनी पुढे पत्रात भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, गावोगाव कधी सायकलवर,कधी मोटरसायकलवर, तर पायीच प्रवास करणे इथपासून सुरू झालेला माझा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला; हे माझ्यासाठीच अविश्वसनीय असल्याचंही अधोरेखित केलं.
खरोखरच मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, कधीतरी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आपण काम करू. सामान्यमधल्या असामान्य शक्तींना जागृत करणे हीच तर आपल्या पक्षाची किमया आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आनंद तर होताच पण त्याहून अधिक जबाबदारीचे दडपण होते.
अनेक पिढ्यांनी,अतिशय कष्टाने,रक्ताचे पाणी करून राज्यात हा पक्ष उभा केला,वाढवला आणि त्यातून माझ्यासारखे कित्येक कार्यकर्ते घडले. उत्तमरावजी पाटील, ना. स. फरांदे, गोपीनाथराव मुंडे, @nitin_gadkariजी, भाऊसाहेब फुंडकर, @Dev_Fadnavisजी, @SMungantiwar भाऊ यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी जे पद भूषविले, त्या पदाची जबाबदारी स्वीकारणे हे माझ्यासाठी शिवधनुष्य होते. ते शिवधनुष्य समर्थपणे पेलण्याचा मी माझ्या परीने व आपल्या साथीने प्रामाणिक प्रयत्न केला.
या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मी महाराष्ट्रभर अनेकवेळा प्रवास केला. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात,चांद्यापासून बांद्यापर्यंत, तळागाळापर्यंत व्यक्तिशः पोहचण्याचा प्रयत्न केला. बूथवरचे सामान्य कार्यकर्ते ते राज्यातील नेते अशा सर्वांमध्ये योग्य समन्वय ठेऊन पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी प्रयत्न केले. आपण, महाराष्ट्रामध्ये संघटनपर्व यशस्वीपणे राबवत दीड कोटी सदस्यसंख्या असलेला भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला पक्ष बनवला ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे
माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती.परंतु,पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी, गृहमंत्री आदरणीय @AmitShah भाई, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @JPNadda जी, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आपण विचारमंथन केले, झालेल्या चुकांमधून शिकलो, मरगळ झटकून मेहनत केली आणि विधानसभा निवडणुकीत वाजत गाजत विजयश्री खेचून आणली.
आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपा- महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. या यशाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्ते म्हणून केवळ आपल्यालाच आहे. अपयशाची निराशा आणि यशाचा आनंद असे दोन्ही शिकवणारा हा अध्यक्षपदाचा प्रवास होता.
मी स्वतःला खरं भाग्यवान समजतो की, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींसारखे व्यक्तिमत्व देशाचे नेतृत्व करत असताना मला ही जबाबदारी मिळाली. आदरणीय मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पात भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला योगदान देण्याची संधी मिळाली व आता राज्याचा महसूल मंत्री म्हणून ही संधी मला मिळत आहे याचा मला सर्वाधिक आनंद आहे.
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डाजी, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी,आदरणीय @byadavbjp जी,@blsanthosh जी, आदरणीय @shivprakashbjp जी या सर्व मान्यवरांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मला आशा आहे की, या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतून मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला असेल.
या संपूर्ण प्रवासात पक्षाच्या सर्व नेत्यांनी,पदाधिकाऱ्यांनी व आपण सर्व कार्यकर्त्यांनी मला खंबीर साथ दिली, त्यामुळे मी हे शिवधनुष्य पेलू शकलो. या प्रवासात राज्यातील मायबाप जनतेने देखील राज्यातील प्रत्येक ठिकाणी अतिशय आपुलकीने स्वागत केले, प्रेम केले, साथ दिली. आपले हे प्रेम व साथ कायम राहील,याची मला खात्री आहे.
"राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः" हे ब्रीद उराशी बाळगून मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मागील तीन दशकांपासून काम करतो आहे. मी विश्वास देतो की, आई जगदंबेच्या आशीर्वादाने माझ्या जीवात जीव असेपर्यंत याच प्रामाणिकतेने काम करत राहीन.
आपल्या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार! अध्यक्ष म्हणून काम करीत असताना अनवधानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कुणाला रागावलो असेल तर मी आपणा सर्वांची मनापासून माफी मागतो.आपला लोभ असाच कायम असावा,अशी विनंतीही बावनकुळेंनी यावेळी पत्रात म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.